२०० विद्यार्थ्यांची पालकांना पत्रे
By Admin | Updated: June 30, 2016 02:51 IST2016-06-30T02:51:22+5:302016-06-30T02:51:22+5:30
आपला देश स्वच्छ आणि आरोग्य संपन्न राहावा यासाठी आपल्या घरी तातडीने शौचालय बांधावे
_ns.jpg)
२०० विद्यार्थ्यांची पालकांना पत्रे
आविष्कार देसाई,
अलिबाग- ‘प्रिय, बाबा स.न.वि.वि. पत्रास कारण की...आपला परिसर आणि आपला देश स्वच्छ आणि आरोग्य संपन्न राहावा यासाठी आपल्या घरी तातडीने शौचालय बांधावे’, अशा आशयाची सुमारे दोनशे पत्रे अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांना लिहिली आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच सर्व जिल्ह्यामध्ये तो राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत विविध इनोव्हेटीव्ह आयडिया राबविल्या जात आहेत. रायगड जिल्ह्याला २०१६ मध्ये ३८ हजार ५८२ वैयक्तिक शौचालये बांधायची आहेत. आतापर्यंत चार हजार ३३५ वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. अद्यापही ३४ हजार २४७ वैयक्तिक शौचालये बांधायची शिल्लक आहेत.
वेळ कमी आणि टार्गेट जास्त असल्याने रायगड जिल्हा परिषद विविध संकल्पना राबवित आहे. अशीच एक भन्नाट कल्पना मंगळवारी अलिबाग तालुक्यातील शाळांमध्ये राबविण्यात आली. तेथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी वैयक्तिक शौचालयाची गरज याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर शौचालय नसलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या आई-वडिलांना पत्र लिहून वैयक्तिक शौचालयाची मागणी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.
>पत्र पाठविण्यामध्ये मुलींची संख्या मोठी
पत्र पाठविण्यामध्ये मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे त्यांच्या आई-वडिलांना दोन-तीन दिवसात पोस्ट आॅफिसमार्फत प्राप्त होतील.
मुलांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीला पालक सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख जयवंत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
>वैयक्तिक शौचालय बांधण्याची मागणी
सुमारे २०० विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांना पत्र लिहून घरी वैयक्तिक शौचालय बांधण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील नवगाव हायस्कूल, परहूर येथील खोपकर महाविद्यालय, कावीर ग्रामपंचायत हद्दीतील आर.पी.पाटील हायस्कूल तसेच खानाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नुसते टार्गेट पूर्ण करणे हा उद्देश नसून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटणे हे महत्त्वाचे असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.