अलिबाग/रोहा : रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र निर्णय घेऊ, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिबागमध्ये शनिवारी केले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्यांनी बोलताना विचार करावा. यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. दिवंगत एन. डी. पाटील, गणपत देशमुख यांनी शेकाप वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र त्याला मर्यादा आहेत. सतत विरोधी पक्षात बसून आंदोलन, रस्ते अडवून, प्रश्न सुटत नसतात. प्रश्न सोडविण्यासाठी सरकारमध्ये असणे गरजेचे आहे. सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविता येतात, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘शेकाप’ला दिला.