एलईडी, पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:09 IST2020-02-24T23:08:54+5:302020-02-24T23:09:06+5:30

रेवस बंदरात ५०० बोटी उभ्या; उपासमारीची वेळ; मच्छीमारांचा आंदोलनाचा इशारा

LED, percussion fishing threatens traditional business | एलईडी, पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

एलईडी, पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

अलिबाग : एलईडी पर्ससीन पद्धतीच्या बेसुमार मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून त्यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे; त्याचबरोबर अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या असून, भविष्यात सुमारे ४० मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन मासेमारी सुरू असल्याने पारंपरिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रेवस परिसरातील मासेमारी करणाऱ्या तब्बल ३०० टॉलर्स १ फेब्रुवारीपासून २२ दिवस खाडीत उभ्याच आहेत. त्यामुळे परिसरातील मच्छीमार हतबल झाले असून, सरकारने कडक कारवाई करून एलईडी पर्ससीन मासेमारी पूर्णपणे बंद केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा मच्छीमारांकडून देण्यात आला आहे.

शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्ससीन, बुलनेट पद्धतीने मासेमारी करण्यावरही प्रतिबंध आहे. मात्र तरीही मच्छीमार मोठ्या प्रमाणात पर्ससीन तसेच एलईडी दिव्यांचा वापर करून बेसुमार मासेमारी करीत आहेत. वारंवार तक्र ारी करूनही जिल्हा प्रशासनाने एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. एलईडी मच्छीमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचा संसार उसनवारीवर सुरू आहे. ही उपासमार थांबायची असेल तर एलईडी पद्धतीची मच्छीमारी बंद व्हायला हवी, अशी भूमिका मच्छीमार बांधवांनी घेतली आहे. आम्हीही अशा प्रकारे बेसुमार मासेमारी करू शकतो; पण तसे केल्याने आमच्या भावी पिढ्यांसाठी समुद्रातील मत्स्यसंपदा तसेच अनेक प्रजाती नष्ट झालेल्या असतील, असे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारे अंकुश गोवर्धन कोळी, धनाजी गणपत कोळी यांनी सांगितले.

पर्ससीन आणि एलईडी मासेमारी करणाºया बोटींद्वारे मुंबई ते रत्नागिरी परिसरातील समुद्रात १२ नोटिकलच्या आत आणि बाहेरही बेसुमार मासेमारी सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणावर पैसा दिसत असल्याने मोठे भांडवलदार यात उतरलेत. एकेक बोट ३ दिवसांत २० ते ३० टन सर्व प्रकारचे लहानमोठे मासे गोळा करीत असल्याने संपूर्ण परिसरात एकही मासा उरत नसल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारीसाठी जाणाºया बोटींना हात हलवत परत यावे लागत आहे.

प्रत्येक फेरीसाठी बर्फ, डिझेल, पगारावर केलेला खर्चही पाण्यात जात आहे. साधारणत: एका ट्रिपसाठी ४.५० लाखांचा खर्च वाया जात असल्याचे मच्छीमार सांगतात. त्यामुळे आमच्या बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्याय उरला नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यावाचून पर्याय उरणार नाही. समुद्र आमची शेती आहे. ती आयुष्यभर जगवायची आहे, जाळायची नसल्याचे कमल्या नाखवा या मच्छीमाराने सांगितले.

एलईडी, पर्ससीन मासेमारांनी संपूर्ण दर्याच नष्ट केला आहे. बांधलेल्या बोटींचे पैसे फेडायचे तरी कसे? आम्ही खायचे काय? आणि जगायचे कसे, असा प्रश्न तुळशीबाई चंदर कोळी यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: LED, percussion fishing threatens traditional business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.