दासगाव आरोग्य केंद्राला गळती
By Admin | Updated: July 23, 2015 04:07 IST2015-07-23T04:07:12+5:302015-07-23T04:07:12+5:30
महाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दुरुस्तीचे

दासगाव आरोग्य केंद्राला गळती
सिकंदर अनवारे , दासगाव
महाड तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दुरुस्तीचे काम करून लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. संपूर्ण इमारत गळत असल्याने आरोग्य केंद्रात पाणी साचले आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत असून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावात जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. महामार्गावर होणारे अपघात तसेच आपत्कालीन स्थितीत हे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जवळपास २२ गावे आणि ३९ वाड्यांमधील ग्रामस्थांना उपचारांकरिता दासगावचे आरोग्य केंद्रच आधार ठरत आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्राप्रमाणेच ठेकेदारांचे कुरण बनले आहे. २०१० पासून आजतागायत या केंद्रावर अनेक दुरुस्तीची कामे झाली. २०१० मध्ये ७ लाख ७६ हजार ४११ रुपये तर २०१४ मध्ये ४ लाख ७५ हजार २८८ रुपये, २ लाख ५४ हजार ५०३ रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये डॉक्टर राहत असलेल्या निवासांची दुरुस्ती, छतावर पत्रे, दरवाजे बदलणे, स्वच्छतागृह, प्रसूतीगृह, नवजात शिशु कक्ष बांधण्यात आले.
नवीन ४ क्वार्टर देखील बांधण्यात आले आहेत. स्थानिक ठेकेदाराने हे काम करताना कोणत्याही प्रकारची गुणवत्ता कायम ठेवली नाही. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने इमारतीला गळती लागली आहे. डॉक्टरांच्या निवासांची देखील अशीच स्थिती आहे. बांधलेले प्रसूतीगृह निकृष्ट असल्याने ते बंद ठेवण्यात आल्याने महिलांचे हाल होत आहेत.