भातकापणीसाठी मजूर महागले
By Admin | Updated: October 24, 2016 01:47 IST2016-10-24T01:47:14+5:302016-10-24T01:47:14+5:30
अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे.

भातकापणीसाठी मजूर महागले
विक्रमगड : अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे. सर्वच आदिवासी शेतकरीवर्गाने आपल्या रितीप्रमाणे शेतवरील देवतांना नारळ फोडून कापणीच्या कामाला लागलेला आहे. मात्र हा हंगाम भातकापणीचा असल्याने सर्वत्र शेतावर हीच कामे चालू आहेत. त्यामुळे या हंगामात कुणीही व्यक्ती मोकळा दिसत नाही.अगर त्यांस कामाची आवश्यकता नसते. कारण आपल्याच शेतावरील काम भरपूर असल्याने दुसरीकडे जाण्यास वेळस नसतो. भातकापणीची कामे एकच वेळेस सर्वत्र चालू झाल्याने आता मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भागात कापणीची कामे खोळंबली आहेत.
विक्रमगड तालुक्यातील ८६ गावे व अनेक पाडे असून ८५८५ हेक्टर क्षे़त्रावर भाताची लागवड केली जाते. येथील शेतकरी झिनी, सुरती, गुजरात-११, गुजरात-४, रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदीविध भातांच्या वाणांची लागवड करुन उत्पन्न घेतात. येथील गावठी भाताच्या वाण प्रसिध्द असून त्याची मागणीही मोठी आहे.
या भागात भाताचेच मोठे व एकच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या भागाला भातशेतीचे कोठार म्हणून ओळखले जात आहे. तालुक्यात कारखानदारी एम.आय.डी.सी वा कोणतेही मोठे धंदे नसल्याने येथील शेतीव्यवसायांवरच अवलंबून असलेल्या मजुरांना चार महिने हाताला काम मिळते. परंतु सर्वत्र शेती केली जात असल्याने प्रत्येक कुटुंबे आपल्या शेतावर काम करण्यातच चार महिने निघून जात असल्याने भातलावणीसाठी व अन्य शेतीच्या कामांसाठी इतर शेतकऱ्यांना तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक या ठिकाणाहुन मजूर आणावे लागत आहेत. या मजुरांना दररोज २०० ते ३०० रु मजुरीप्रमाणे मोजावे लागणार असून शिवाय दोन वेळच्या जेवणाचा खर्च द्यावा लागतो. मात्र मजुरी वाढलेली असली तरीही मजुरांअभावी भात संपुष्टांत येण्याच्या मार्गावर आहे. (वार्ताहर)
हा ग्रामीण आदिवासी भागत असल्याने येथे मजुरांची संख्या मोठी आहे. जे शेत मजुरीची कामे करु शकतात असे मजूर बोटींवर मासेमारीकरिता जात असतात. तसेच बिल्डींगची कामे, नदी व खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्याकरिता जात आहेत. यामुळे भातशेतीसाठी हंगामात मिळणारे मजूर मिळत नसल्याने भातपिकाची कामे कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच श्रीमंत शेतकरी शेतामध्ये स्वत: राबत नसल्याने मजूर लावूनच शेती करीत असल्याने त्यांना तर मोठा फटका बसलेला आहे.