गडांचा राजा राजांचा गड किल्ले राजगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:29 IST2016-04-25T02:29:21+5:302016-04-25T02:29:21+5:30

राजगड हा गुंजण मावळ खोऱ्यात उभा आहे.

King of fortresses | गडांचा राजा राजांचा गड किल्ले राजगड

गडांचा राजा राजांचा गड किल्ले राजगड


राजगड हा गुंजण मावळ खोऱ्यात उभा आहे. आदिलशाहीच्या ताब्यात असणारा मुरुंबदेवाचा डोंगर शिवाजीमहाराजांनी घेऊन या किल्ल्याचे बांधकाम मनासारखे करून शिवाजीमहाराजांनी या किल्ल्यास नाव दिले किल्ले राजगड. या राजगड किल्ल्यास स्वराज्याची राजधानी करून राजांनी २७ वर्षे स्वराज्याचा राज्यकारभार चालविला. अशा या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राजगड आजही तेवढाच बुलंद आहे. शिवरायांनी जयसिंगासोबत केलेल्या तहात काही किल्ले स्वत:कडे ठेवले होते. त्यात राजगडचा समावेश होतो. राजगडावर सभोवताली तीन माच्या आहेत. बालेकिल्ला पाहताना त्याचे बांधकाम अभेद्य दिसते. मनात जणू धास्तीच बसते. पाली दरवाजाने गडावर जायचे झाल्यास पायथ्याशी पाली हे गाव लागते. या मार्गावर प्रशस्त अशा पायऱ्या आहेत. पाली दरवाजा खूप उंच असून शिवरायांच्या काळात किल्ल्यावर जड वस्तू, तसेच हत्ती अंबारी ने-आण करण्यासाठी या दरवाजांचा वापर केला जात असे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आणखी एक प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वाराचा उपयोग तोफा डागण्यासाठी, तसेच या दरवाजातून पद्मावती माचीवर जाता येते. गुंजवणे दरवाजा या मार्गाने दीड ते दोन तासांत किल्ल्यावर पोहोचता येते. पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावातून याचा मार्ग सुरू होतो. या मार्गाने जात असताना तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूस बलदंड बुरुज आहेत. या माचीवर शिवरायांचे सैनिकी केंद्र आहे. सैनिकांचे निवासस्थान या ठिकाणी होते. आजही बांधकाम केलेले अवशेष पाहायला मिळतात. या माचीवर पद्मावतीदेवीचे मंदिर, सईबाईची समाधी, रत्नशाला, पद्मावती तलाव, दारूगोळ्याची कोठारे, अष्टप्रधान मंडळाची घरे, हवालदारांचा वाडा, गुप्त दरवाजा आपणास पाहायला मिळतात. मुरुंबदेवाचा डोंगर ताब्यात घेतल्यानंतर शिवाजीमहाराजांनी पूर्वेकडील भागास तटबंदी केली व त्यास सुवेळा माची असे नाव दिले. या माचीवर शेवट चिलखती बुरुज असून पुढे एका खडकात तीन मीटरचे छिद्र आहे. याला हत्तीप्रस्तर किंवा नेट म्हणतात. याच्या पुढील भागात गुप्त दरवाजा असून शेवट वाघजाईचे शिल्प आढळते.
- मनोज कुंभार

Web Title: King of fortresses