आज देशभरात साजरा होणार कारगिल विजय दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:53 IST2019-07-25T22:53:04+5:302019-07-25T22:53:13+5:30
रायगड जिल्ह्यातील दहा चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुमारे तीन हजार महाविद्यालयीन युवकांना मोफत दाखवण्यात येणार आहे.

आज देशभरात साजरा होणार कारगिल विजय दिन
अलिबाग : देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्यांबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृद्धिंगत होण्यासाठी राज्यातील चित्रपटगृहांमध्ये ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील दहा चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुमारे तीन हजार महाविद्यालयीन युवकांना मोफत दाखवण्यात येणार आहे.
कारगिल विजय दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी राज्य सरकारने याबाबतची बैठक काही दिवसांपूर्वीच घेतली होती. सकाळी १0 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांनी या सिनेमाद्वारे प्रेरित व्हावे असा सरकारचा उद्देश आहे, असे रायगडचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अलिबाग महेश सिनेप्लेक्स, पेण मोरेश्वर चित्रमंदिर, पनवेल के मॉल, सिनेराज, आयमॅक्स, कार्निवल सिनेमा आणि पीव्हीआर सिनेमा, कर्जत राज, महाड गांधी आणि अन्य एका सिनेमागृहाचा समावेश आहे.