‘जेरुसलेम गेट’ होणार जागतिक पर्यटन स्थळ, तब्बल २०० ज्यू धर्मीय बांधवांची नवगावला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 02:08 PM2018-01-15T14:08:00+5:302018-01-15T14:27:56+5:30

सुमारे दोन हजार वर्षापूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्त्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव या ठिकाणी आश्रयाला उतरले.

jerusalem gate to become tourist spot, | ‘जेरुसलेम गेट’ होणार जागतिक पर्यटन स्थळ, तब्बल २०० ज्यू धर्मीय बांधवांची नवगावला भेट

‘जेरुसलेम गेट’ होणार जागतिक पर्यटन स्थळ, तब्बल २०० ज्यू धर्मीय बांधवांची नवगावला भेट

googlenewsNext

- जयंत धुळप

अलिबाग- सुमारे दोन हजार वर्षापूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्त्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव या ठिकाणी आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते हे अलिबाग तालुक्यातील नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरुसलेम गेट’ म्हणून ओळखले जाते. याच ‘जेरुसलेम गेट’ स्थळाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. यासाठी इस्त्रायलमध्ये गेलेल्या ज्यू बांधवांनी रविवारी मकर संक्रांतीचं औचित्य साधून नवगाव या ठिकाणी भेट देवून भारतातील या आपल्या पहिल्या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्प जाहीर करुन, भारत-इस्त्रायला मैत्रीचा गोडवा वृद्धिगत केला आहे. रविवारी इस्त्रायलमधील तब्बल 200  ज्यू नागरिकांनी नवगांवला भेट दिली. यामध्ये अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ज्यू बांधवांचाही समावेश होता अशी माहिती अलिबागेतच लहानाचे मोठे झालेले आणि आता इस्त्नाएल मध्ये वास्तव्यास असलेले जोनाथान मोझेस वाक्रुळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

तिळगुळ देवून मैत्रीचा धागा अधिक केला  बळकट 
यावेळी या सर्व ज्यूईश बांधवांनी नवगाव येथे आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना जेरुसलेम गेट या पवित्रस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. विनंती मान्य करुन बोलताना आमदार जयंत पाटील यांनी, नवगाव या ठिकाणी असलेल्या ‘जेरुसलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभिकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक  ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. हिंदू-ज्यू संबंध अधिक वृद्धीगत व्हावेत, यासाठी जगभरातून नवगाव येथे आलेल्या ज्यू बांधवांनी आमदार जयंत पाटील यांना तीळगुळ देवून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला. रायगडमधून ज्यू लोक जाऊन मोठा कालावधी लोटला आहे. तरीही त्यांनी येथील मातीशी नाते तोडलेले नाही. नवगाव या ठिकाणी दुरवस्थेत असलेले हे स्थळ विकसीत केल्यास भारत आणि इस्त्नाएलमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील असा विश्वास आ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतिक होईल
ज्यू धर्मीयांवर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र, भारतात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणो एकरुप झाला. आजच्या घडीला जगभर हदशतवादी हल्ले वाढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतिक होईल, अशी भावना इस्त्नाएल मधील ज्येष्ठ ज्यू बांधव जॉनाथॉन सोलमन यांनी व्यक्त केली.

 स्थानिक समाजाने प्रेमाने आपलेसे केले
दोन धर्मामध्ये कसे नाते असावे याचे प्रतिक म्हणून ‘जेरुसलेम गेट’ हे स्थळ विकासीत होऊ शकते. जागतिक शांततेसाठी हे एक आदर्श असे नाते आहे. भारताच्या आश्रयाला आलेल्या ज्यू धर्मियांना येथील स्थानिक समाजाने प्रेमाने आपलेसे केले. याची नोंद या स्थळाच्या माध्यमातून घेतली जाईल, अशी भावना ज्यू धर्मीय कुस्तीपटू आणि सन 1972 मधील ‘भारत श्री’ किताबप्राप्त विजू पेणकर यांनी व्यक्त केली आहे. दोन हजार वर्षापूर्वी भारतात ज्या ठिकाणी  ज्यू बांधवांनी पहिल्यांदा पाऊल ठेवले ते  नवगाव येथील जेरु सलेम गेट चांगल्या प्रकारे विकसीत व्हावे, असे जगभरातील ज्यू धर्मियांना वाटत असते. यासाठी येथून गेलेली ज्यू मंडळी एकत्र येवून प्रयत्न करीत आहेत.त्या प्रयत्नांना आता नक्की यश येईल अशी भावना अमेरिकेत स्थाईक झालेले ज्यू धर्मीय जॉन पेरी पेझारकर यांनी व्यक्त केली आहे.
पन्नास वर्षानंतरही आश्रयस्थळाशी नाते कायम

ज्यू बांधव नवगाव येथून इस्त्रायलमध्ये गेले त्या घटनेला पन्नास वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरीही त्यांचे आश्रयस्थळाशी असलेले नाते अजिबात तुटलेले नाही. आलेल्या ज्यू बांधवांपैकी बहुतेकजण उत्तम मराठीतूनच बोलत होते. येथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जुने सहकारी भेटल्याने अनेकजण या जुन्या आठवणीने भारावून गेले होते.  
 

Web Title: jerusalem gate to become tourist spot,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.