मोऱ्या देताहेत अपघातांना निमंत्रण
By Admin | Updated: August 3, 2015 03:53 IST2015-08-03T03:53:52+5:302015-08-03T03:53:52+5:30
मुंबई - गोवा महामार्गाचे २०१२-१३ मध्ये रुंदीकरण तसेच मोऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत पोलादपूर ते

मोऱ्या देताहेत अपघातांना निमंत्रण
दासगाव : मुंबई - गोवा महामार्गाचे २०१२-१३ मध्ये रुंदीकरण तसेच मोऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत पोलादपूर ते माणगाव दरम्यान करण्यात आले. या कामात अंदाजे १५० हून अधिक मोऱ्यांचे रुंदीकरण झाले. मात्र साइडपट्ट्यांअभावी हे रुंदीकरण दुचाकी वाहनांना जीवघेणे ठरले आहे.
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात २९ मोऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. महाड तालुक्यात सर्वाधिक १०४ मोऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. तर उर्वरित मोऱ्याचे बांधकाम माणगाव तालुक्यात करण्यात आले. यापूर्वीच्या दुपदरी मुंबई - गोवा राष्ट्रीय मार्गाच्या मोजमापानुसार बांधण्यात आलेल्या या मोऱ्या काहीशा अरुंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाढवण्यासाठी २०१२-१३ मध्ये मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विशेष कार्यक्रम हाती घेतला. तत्पूर्वी साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करून त्यावर डांबरीकरण केल्याने दुपदरी रस्ता हा तीन पदरी झाला आहे. यामुळे मोऱ्यांच्या रुंदीकरणाची आवश्यकता दिसून आली होती. या रुंदीकरणादरम्यान साइडपट्टी शिल्लक न राहिल्याने रस्त्याच्या दुतर्फा माती भराव करण्यात आला, मात्र हा भराव गेल्या दोन पावसाळ्यात पाण्याने खचून साइडपट्टी रस्त्यापासून अर्धा ते एक फूट खाली गेली आहे. परिणामी रुंदीकरण झालेल्या मोऱ्यांचे बांधकाम हे रस्त्याच्या पातळीला समान आहे तर साइडपट्टीवर उतरलेली वाहने या मोऱ्यांच्या काँक्रीट बांधकामावर धडकून अपघात होत आहेत.
पोलादपूरच्या कशेडी घाटापासून ते माणगावपर्यंत गेल्या दोन ते तीन वर्षांत मोऱ्यांना आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या मधोमध राहून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. वाहतूक पोलीस महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी येत्या गणेशोत्सवापूर्वी मोऱ्यांच्या बांधकामावर दगड, मातीचे भराव करण्याची आवश्यकता आहे. तर मोऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या साइडपट्ट्यांवर देखील भराव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे न केल्यास येत्या गणेशोत्सवामध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (वार्ताहर)