खोपोलीत डोणवत धरण ओव्हरफ्लो
By Admin | Updated: July 30, 2015 00:14 IST2015-07-30T00:14:29+5:302015-07-30T00:14:29+5:30
पावसाने पुन्हा जोर धरल्याने खोपोली परिसरातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येथील झेनिथ धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असला तरी अपघात टाळण्यासाठी

खोपोलीत डोणवत धरण ओव्हरफ्लो
खालापूर : पावसाने पुन्हा जोर धरल्याने खोपोली परिसरातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येथील झेनिथ धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असला तरी अपघात टाळण्यासाठी याठिकाणी जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला जात आहे. त्यामुळे डोणवत धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
खोपोली परिसरात अनेक लहान मोठे धबधबे असून मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, नवी मुंबई येथील पर्यटक याठिकाणी वर्षा सहलीसाठी येतात. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी हा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. खोपोलीत येणारी रेल्वे तर प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेली असते. झेनिथला पर्यटकांची पहिली पसंती असली तरी या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही उपाय नाहीत.
याठिकाणी असलेले डोणवतचे धरण व आडोशीचा निसर्गरम्य धबधबा सध्या ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. तांबाटी गावातील या धरणावर पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांचा आणखी ओघ याठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
डोणवत धरण परिसरात पर्यटकांनी फार आत जाऊ नये. पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी ग्रामपंचायत सकारात्मक विचार करीत आहे. शासनाने पर्यटन निधीअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करु न दिल्यास एक चांगले पर्यटनस्थळ निर्माण होऊ शकते.
-संदेश पाटील,उपसरपंच, तांबाठी
डोणवतचे धरण खोपोली-पेण रस्त्यावर खोपोलीपासून १२ कि.मी. अंतरावर आहे. तर आडोशीचा धबधबा ६ कि.मी. अंतरावर आहे. पर्यटकांच्या दृष्टीने सोयीचे, सुरक्षित व रस्त्यापासून जवळचे ठिकाण म्हणून डोणवत धरणाला पसंती मिळत आहे.