International Yoga Day: 'योगसाधनेतून मिळते निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:57 IST2019-06-21T00:57:30+5:302019-06-21T00:57:42+5:30
आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव मुक्ती व शरीर स्वास्थ्यासाठी योगासने ही अतिआवश्यक आहेत, असे योग प्रशिक्षक स्मिता देवळे यांनी सांगितले.

International Yoga Day: 'योगसाधनेतून मिळते निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली'
पेण : योग केल्याने आत्मविश्वास वाढतो. ताणतणाव व नैराश्यपूर्ण जीवनाचा अंत करून निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली योगसाधनेतून मिळते. निसर्गात चैतन्यशक्ती काम करते. निसर्ग सहजीवनाचा स्रोत आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम’ असे हे परस्परावलंबी जीवन आहे. मंगलमय जीवन समग्र सजीवांना जगता यावे, ही शिकवण म्हणजे योगसाधना आहे. योगामुळे वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीरयष्टी, तजेलदार त्वचा कांती, शांत आणि प्रसन्न मन, आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट हवी असते ती द्यायला योगसाधना समर्थ आहे. आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव मुक्ती व शरीर स्वास्थ्यासाठी योगासने ही अतिआवश्यक आहेत, असे योग प्रशिक्षक स्मिता देवळे यांनी सांगितले.
जागतिक योगदिनानिमित्त ‘लोकमत’च्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला त्या वेळी त्या बोलत होत्या. स्मिता देवळे यांनी आर्ट आॅफ लिव्हिंग प्रीझन स्मार्ट कार्यशाळांमधून पोलीस कर्मचारी, बालसुधारगृहातील बालकांसाठी, कारागृहातील बंदिवानांसाठी, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना योगाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने धडे दिलेत. त्यांच्या या कार्याचा अनेक संस्थांनी पारितोषक देऊन गौरव केला आहे.
२१ जून रोजी जागतिक योगदिनानिमित्ताने पेण पंचायत समिती मार्फत एनसीआरटी कर्मचाऱ्यांसाठी योगासने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन के ल्याचे त्यांनी सांगितले. योगसाधनेचा प्रचार करणे हेच त्यांचे ध्येय असल्याचे देवळे यांनी सांगितले. योगाबाबत उस्फुर्तपणे बोलताना स्मिता देवळे यांनी योगाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विषद केले. यामुळेच आज जगभरात योगाचे धडे दिले जात आहेत असे सांगितले.
योगामुळे जीवन सुखी, समाधानी सुंदर, सुरेख कसे जगता येईल ही कला आवगत होते. योग केल्याने आत्मविश्वास वाढतो. ताणतणाव व नैराश्यपूर्ण जीवनाचा अंत करुन निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली योगसाधनेतून मिळते. योगामुळे जीवनात आनंदी राहण्यास मदत मिळते, त्यामुळे नित्य योगसाधना करावी.