भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: September 3, 2015 23:27 IST2015-09-03T23:27:51+5:302015-09-03T23:27:51+5:30
पाऊस सतत विश्रांती घेत असल्याने शेतकरी पाऊस सुरु झाल्यापासून चिंतेत आहे. आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम भातपिकावर जाणवू लागला आहे.

भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव
कर्जत : पाऊस सतत विश्रांती घेत असल्याने शेतकरी पाऊस सुरु झाल्यापासून चिंतेत आहे. आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम भातपिकावर जाणवू लागला आहे. कारण खडकाळ आणि मुरमाड जमिनीमधील पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. तसेच भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने भाताचे पीक हातात येण्याची शक्यता कमी झाली आहे.
कर्जत तालुक्यात सध्या पावसाळ्यात दहा हजार हेक्टर जमिनीमध्ये भाताची शेती करण्यात आली आहे. परंतु पावसाने तीन महिन्याच्या काळात नियमितपणा ठेवला नाही. त्यामुळे शेते कोरडी पडली आहे. यावर्षी जेमतेम १८०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांच्या संकटात भर म्हणून की काय आता शेतातील भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. कारण भाताचे पीक आता कोंब येण्याचे स्थितीत असताना रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. कळंब , ओलमण, बोरगाव, खांडस आदी भागातील भाताच्या पिकावर सध्या बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. या रोगाची कीड ही कोंबीमध्ये घुसून भाताचा चुड खराब करते आणि नंतर त्याचा फैलाव संपूर्ण शेतात होतो, वातावरणामध्ये जोरात हवा असेल तर त्या किडी आणि कीटक हे बाजूच्या शेतातील भाताच्या पिकाला आपले लक्ष्य करतात. बगळ्या आणि अन्य तत्सम रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने कृषी विभागाच्या कृषी सहायकांचा सल्ला घेण्याचे आवाहन कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी केले आहे. शेत कोरडे पडले तर किडी आणि भुंगे यांना भाताच्या पिकावर हल्ला करण्याची संधी मिळते. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)