स्वतंत्र कोकण राज्याची मागणी अयोग्य
By Admin | Updated: May 2, 2017 03:04 IST2017-05-02T03:04:26+5:302017-05-02T03:04:26+5:30
१०५ हुतात्म्यांच्या रक्तातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. अद्यापही संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झालेले नाही. अशा परिस्थितीत

स्वतंत्र कोकण राज्याची मागणी अयोग्य
महाड : १०५ हुतात्म्यांच्या रक्तातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. अद्यापही संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झालेले नाही. अशा परिस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करणे, अयोग्य असल्याचे मत महाड येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ यांनी सोमवारी लाडवली येथील नवयुग विद्यापीठ ट्रस्टमध्ये व्याख्यानादरम्यान बोलताना व्यक्त केले. स्वतंत्र कोकण राज्यापेक्षा बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होण्यावर अधिक भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नवयुग तरुण मंडळ, लायन्स क्लब महाड आणि नवयुग विद्यापीठ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नवयुग विद्यापीठ ट्रस्टमध्ये रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे महाड नगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि पत्रकार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने, ‘संयुक्त महाराष्ट्र एक चळवळ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
बाळ व्याख्यानात म्हणाले की, ‘आज ‘कामगार दिन’ आणि ‘महाराष्ट्र दिन’ आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जे आंदोलन उभे राहिले होते, त्या आंदोलनात मुंबईतील गिरणी कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आणि म्हणूनच महाराष्ट्रात कामगार दिनाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. भाषावार प्रांत रचना करताना, तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी जी भूमिका घेतली हाती, त्यामुळेच आजही अनेक मराठी भाषक भाग हा कर्नाटकमध्ये आहे. जोपर्यंत बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत नाही, तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही,’ असेही ते म्हणाले.
या कार्यक्र माला नवयुग विद्यापीठ ट्रस्ट आणि नवयुग तरुण मंडळाचे संस्थापक अॅड. विजयसिंह जाधवराव, अध्यक्ष रणजितसिंह जाधवराव, माजी नगरसेवक बिपीन म्हामुणकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष कैलास जंगम, लादूलाल जैन, बाबूलाल जैन, मोहन शेठ, पत्रकार प्रवीण कुलकर्णी, मनोज खांबे, श्रीकांत सहस्रबुद्धे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनीही हजेरी लावली होती. (वार्ताहर)