टँकरमधून रसायन सोडून देण्याच्या प्रकारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:58 AM2020-03-06T00:58:07+5:302020-03-06T00:58:13+5:30

विशेष म्हणजे, यामधील कंपन्यांची नावे महाड औद्योगिक वसाहतीमधील आहेत. या कंपन्यांकडून आपले पूरक उत्पादन असल्याचे भासवले जात आहे.

Increase in the release of chemicals from the tanker | टँकरमधून रसायन सोडून देण्याच्या प्रकारात वाढ

टँकरमधून रसायन सोडून देण्याच्या प्रकारात वाढ

Next

सिकंदर अनवारे 
दासगाव : गेल्या काही महिन्यांत घाटात किंवा नाल्यात टँकरमधून रसायन सोडण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. पोलादपूरमधील कशेडी घाटात हा प्रकार उघड झाल्यानंतर कळंबोलीतील कासाडी नदीतही असाच प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, यामधील कंपन्यांची नावे महाड औद्योगिक वसाहतीमधील आहेत. या कंपन्यांकडून आपले पूरक उत्पादन असल्याचे भासवले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हे का ओतले जात आहे, असा प्रश्न उभा राहिली आहे. यामध्ये सुदर्शन, अ‍ॅस्टेक, आता हायकल केमिकल ही कंपनीदेखील चौकशीच्या कचाट्यात सापडली आहे.
महाड एमआयडीसी गेली अनेक वर्षे प्रदूषणाच्या मुद्द्यावर कायम चर्चेत राहिली आहे. यामुळे अनेक कारखान्यांवर कारवाईची कुºहाड बसली आहे. मात्र, तरीदेखील नियमांची पायमल्ली करत पर्यावरणाचा ºहास करण्यात या कंपन्या आघाडीवर राहिल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचाही समावेश झाला आहे. प्रदूषित पाणी खाडीत सोडण्याकरिता शासनाने स्वतंत्र रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभे केले आहे. यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी सोडले गेले पाहिजे. मात्र, ज्या ठिकाणी खाडीत पाणी सोडले जाते, त्या ठिकाणी काळपट पाणी जात असल्याने या प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला गेला होता. सांडपाण्यावर होणारा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करताना अनेक कंपन्या आता विविध मार्ग अवलंबू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारखान्यांचे पाणी पूरक उत्पादन म्हणून घेऊन नदीत सोडण्याचा प्रकार काही प्रकारामुळे उघड झाला आहे. अंबरनाथ, लोटे आदी औद्योगिक क्षेत्रात महाडमधून घेऊन जाणारे पूरक उत्पादन किंवा सांडपाणी सरळ सोडल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
महाड एमआयडीसीमधील अंबरनाथ येथील घटनेत कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकार थांबले जातील, अशी अपेक्षा औद्योगिक क्षेत्रात होती. मात्र, पोलादपूरमधील पार्ले गावानजीक २८ डिसेंबर २०१९ रोजी नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने मासे मृत पावल्याची तर कशेडी घाटात सांडपाणी सोडून देण्याचा प्रकार जानेवारी महिन्यात उघड झाला होता, यामुळे वातावरण चांगलेच तापले गेले होते. यातून पोलिसांनी गस्त घालत असताना दोन टँकरचालकांना ३ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले होते. या टँकरमध्ये पी.ए.सी. (पॉली अल्युमिनियम क्लोराइड) हे पूरक उत्पादन असल्याचे दर्शवण्यात आले. विशेष म्हणजे, महाड औद्योगिक क्षेत्रातील दोन बड्या कंपन्यांची नावे यात समोर आली. यामध्ये सुदर्शन केमिकल आणि अ‍ॅस्टेक आताची गोदरेज अग्रोटेक या कंपन्यांचा समावेश होता. या दोन्ही कंपन्यांवर प्रस्तावित आदेश काढण्यात आले आहेत. ६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही कंपन्यांना भेट दिली असता पकडण्यात आलेले दोन्ही टँकर याच कंपन्यांतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपन्यांवर पोलादपूर पोलीस कारवाई करण्यात कुचराई करत आहेत. टँकरचालक मनोहर नानुसिंग सिसोदिया आणि भैरुलाल चुन्नीलाल बराला यांच्यावर कारवाई केली. मात्र, कंपन्यांना मोकाट सोडण्यात आले आहे. तर एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळही ठोस कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत नुकतीच सुनावणी झाली आहे. नदीतील आणि टँकरमधील घेण्यात आलेले नमुनेही प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे.
कारखानदारांवर कठोर कारवाईची मागणी
ज्या वेळी टँकरमधून अशा प्रकारे पाणी सोडण्यात येते, त्या वेळी ज्या कारखान्यांचे नाव समोर येते ते कारखानदार नेहमी आपले उत्पादन असल्याचे सांगतात, जर हे त्यांचे उत्पादन आहे.
एका कारखान्यातून दुसºया कारखान्यात जर हे उत्पादन पोहोचवण्याची जबाबदारी टँकरचालक किंवा ट्रान्सपोर्टची आहे मग हे उत्पादन रस्त्यातच का सोडण्यात येते. सोडल्यानंतरदेखील कारखानदार अशा या ट्रान्सपोर्टवर गुन्हा का दाखल करत नाहीत. याचाच अर्थ हे जे नेण्यात येणारे पाणी हे संशयित असून, याची कारखान्यातून निघतानाच चौकशी होणे गरजेचे आहे.
आजही ज्या कंपन्यांचे पाणी सोडण्यात आले आहे, त्या कंपन्यांनी आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. अशा कारखानदारांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
>हायकलसह एक कंपनी अडचणीत
महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांवर चौकशीचा फेरा मागे लागला असल्याचे दिसून येत आहे. कळंबोली येथील कासाडी नदीमध्ये रसायन सोडल्याचा प्रकार उघड झाला. यामध्येदेखील महाड औद्योगिक क्षेत्रातील हायकल कंपनीचे नाव समोर आले आहे.
हायकल हीदेखील नावाजलेली आणि पर्यावरणाबाबत जागरूक असलेली कंपनी आहे. मात्र, या कंपनीतूनही पूरक उत्पादन म्हणून दिलेले रसायन का सोडले गेले? असा प्रश्न पुढे आला आहे.
घटनास्थळी तीन टँकर पकडले आहेत. यामध्ये महाडमधील अन्य एका कंपनीचे नाव पुढे येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने यांनाही नोटिसा बजावल्या.
सोडण्यात आलेले रसायन हे कंपन्या पूरक उत्पादन असल्याचे सांगत आहेत. मात्र, ते टँकरचालकांकडून का सोडण्यात येत आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. महाडमधील सुदर्शन, अ‍ॅस्टेक आणि हायकल या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- सा. वि. औटी, उपप्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Web Title: Increase in the release of chemicals from the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.