- सिकंदर अनवारेदासगाव : निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू झाली असून आता सभा, पक्षप्रवेशांचे ढोल वाजू लागले आहेत. याकरिता लागणारे प्रचार साहित्य दुकानांत दिसू लागले आहे. विविध पक्षांची स्टीकर, ध्वज, गळ्यातील पट्ट्या आदी प्रचार साहित्य महाडमध्ये दाखल झाले आहे. सोशल मीडियातूनही जोरदार प्रचार होत असल्याने साहित्याला मागणी कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राज्यात विविध भागात राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे राज्यात अद्याप युती आघाडीचा डावपेच सुरू असतानाच महाडमध्ये मात्र गेली महिन्यापासूनच निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. येथील काँग्रेस, शिवसेना या दोन प्रस्थापित पक्षात थेट लढत असल्याने आणि उमेदवारीही निश्चित असल्याने निवडणूक प्रचार सुरू झाला आहे. या प्रचाराला वेग आला असून सोशल मीडियाच्या जमान्यात विविध पक्षाचे झेंडे, पताका, गळ्यातील पट्टे, टोप्या यांना आजही मागणी आहे. एखादी सभा असल्यास याला अधिक मागणी असते. हे प्रचार साहित्य महाडमध्ये दुकानांवर दिसू लागले आहे. हीच एक संधी असल्याने दुकानदारांची समोरील बाजू विविध पक्षांच्या प्रचार साहित्याने झळकली आहेत. उमेदवाराच्या प्रचाराला बाहेर पडतानाच आपण कोणत्या पक्षाचा प्रचार करतोय हे समोरच्याला यामुळे तत्काळ समजते. डोक्यात टोपी आणि गळ्यात पट्टी लावून कार्यकर्ते आता मिरवू लागले आहेत. हे प्रचार साहित्य वर्षभर केव्हा तरी लागत असले तरी पाच वर्षांत या एक महिन्यात मात्र याला प्रचंड मागणी आहे.मुंबईतून येते साहित्य; सभा, कार्यक्रमात मोठी मागणीमहाडमध्ये केवळ एकाच ठिकाणी हे प्रचार साहित्य उपलब्ध आहे. सातत्याने मागणी नसल्याने अन्य दुकानात केवळ ध्वज किंवा स्टीकर असे साहित्य उपलब्ध होते. पक्षाचे झेंडे, साधारण आठ रुपये ते ५०० रुपये, पट्ट्या १५ ते १५० रुपये, टोप्या १० ते ८० रुपये, बॅच १० ते ३० रुपये, अशा दराने उपलब्ध झाले आहेत. अनेकदा हे साहित्य असेच पडून राहते. मात्र, सभा किंवा अन्य कार्यक्रम असल्यास याला मागणी असते, यामुळे हे ठेवावे लागते, असे अरविंद मेहता या विक्रेत्यांने सांगितले. हा सर्व माल मुंबईमधून मागवावा लागत आहे.
प्रचार साहित्य दाखल, विविध पक्षाचे झेंडे, पताका, स्टीकर्सचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 02:33 IST