जप्तीची कारवाई त्वरित थांबवा; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
By वैभव गायकर | Updated: March 15, 2024 19:46 IST2024-03-15T19:45:11+5:302024-03-15T19:46:00+5:30
दुहेरी मालमत्ता कराविरोधात उपोषणकर्ते महादेव वाघमारे, अनिकेत भंडारे, गोपीचंद खरात तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

जप्तीची कारवाई त्वरित थांबवा; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
पनवेल: दुहेरी मालमत्ता कराविरोधात उपोषणकर्ते महादेव वाघमारे, अनिकेत भंडारे, गोपीचंद खरात यांचे दि.13 रोजी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती काही प्रमाणात ढासळल्याची पहावयास मिळाली. उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिल्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांची उपोषण स्थळला भेट देऊन उपोषण सोडायची विनंती केली. मात्र महादेव वाघमारे हे उपोषणावर ठाम असल्याचे पहावयास मिळाले.
पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या दुहेरी कर ,शास्ती,जप्ती नोटीस विरोधात महादेव वाघमारे व पदाधिकारी अनिकेत भंडारे, गोपीचंद खरात हे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान मनसेचे परिवर्तन संघटनेने छेडलेल्या उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 1 डिसेंबर 2022 पासून मालमत्ता कर आकरणी सुरू करावी व नव्याने बिले पाठवावी,मालमत्ता करावर लावलेली शास्ती रद्द करावी आणि ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमधील वसूल केलेली शास्ती व्याजासहित परत द्यावी,मालमत्ताधारकांना पाठविलेल्या जप्तीच्या नोटीसा रद्द कराव्यात या मागण्यांसाठी पनवेल महापालिका मुख्यालयासमोरील महात्मा गांधी उद्यानात हे उपोषण सुरु आहे.