ईव्हीएमविरोधात कर्जतमध्ये घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:26 IST2019-06-19T00:26:44+5:302019-06-19T00:26:59+5:30
निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरच्या आधारे घेण्याची मागणी

ईव्हीएमविरोधात कर्जतमध्ये घंटानाद
कर्जत : आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशिनचा वापर न करता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरच्या आधारे घ्यावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने कर्जत तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. त्यानंतर मागणीचे निवेदन त्यांनी तालुका प्रशासनाला दिले.
तहसीलदार अविनाश कोष्टी यांची जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल गवळे, कर्जत तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, युवा अध्यक्ष प्रदीप ढोले, युवा सरचिटणीस राहुल गायकवाड, युवा नेते धर्मेंद्र मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे गुलाब शिंदे आदीनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जगातील अनेक देशांनी ईव्हीएम मशिन नाकारली आहे म्हणून आगामी विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर करू नये, बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेतल्यास त्यावर मतदारांची विश्वासार्हता राहील असे निवेदनात नमूद केले आहे.
आमच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधावे हाच आंदोलनाचा हेतू आहे, अशी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे तसेच शासनाने याबाबत लवकर भूमिका घेतली नाही तर पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.