कोकणातील ऐतिहासिक बंदरांना गतवैभव पुनर्प्राप्तीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:32 AM2017-11-21T02:32:09+5:302017-11-21T02:32:35+5:30

अलिबाग : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यातील बंदरातून जलवाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

Historical ports in Konkan are the signs of recovery | कोकणातील ऐतिहासिक बंदरांना गतवैभव पुनर्प्राप्तीचे संकेत

कोकणातील ऐतिहासिक बंदरांना गतवैभव पुनर्प्राप्तीचे संकेत

googlenewsNext

जयंत धुळप 
अलिबाग : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यातील बंदरातून जलवाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. कोकणात जलवाहतुकीला संजीवनी मिळावी यासाठी केंद्रात प्रस्ताव देखील सादर केला असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. वसई-कल्याण-ठाणे-धरमतर, रेवदंडा-रोहे आणि जयगड-मुसाकाजी-विजयदुर्ग-देवगड-मालवण असे हे तीन प्रस्तावित जलमार्ग आहेत. या जलवाहतुकीमुळे कोकणातील प्रवाशांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दिवाळीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मुंबई (भाऊचा धक्का)-दिघी-दाभोळ अशी प्रवासी जलवाहतूक करून ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे. सागरी प्रवासी वाहतुकीमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी होवू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.
कोकणातील सागरी वाहतुक ीचा इतिहास देदीप्यमान असाच आहे. इ.स.पूर्व ५०० ते इ.स.२५० पर्यंत चौल, महाड, राजपुरी या बंदरांमधून पर्शिया, ग्रीस, अरेबिया, येमेन आणि इजिप्तबरोबर आयात- निर्यात व्यापार होत असे. परदेशी व्यापाराबरोबर चौल, महाड, मांदाड, राजपुरी व गोरेगाव (तत्कालीन घोडेगाव) ही बंदरे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जुन्नर, नाशिक व पैठणसारख्या व्यापारी केंद्रांशी बोरघाट, देवस्थळी, कुंभा व शेवट्या घाट मार्गांनी जोडलेली होती. प्राचीन उत्तर कोकणात बंदरांच्या सान्निध्यात असलेल्या व्यापारी केंद्रांजवळ बौद्ध धर्मीयांच्या त्यावेळी वसाहती होत्या. कुडे, पाले, कोल, चौलजवळील बौद्ध लेण्यांवरून दिसून येते. या बंदरांव्यतिरिक्त म्हसळा आणि अंतोरे ही बंदरे सुद्धा तत्कालीन आयात-निर्यात व्यापाराकरिता प्रसिध्द होती.
टॉलेमी, पेरिप्सल, स्ट्रॅबो आणि प्लिनी या सागरी प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या माहितीनुसार चौल, मांदाड, महाड(पाले), राजपुरी ,गोरेगाव बंदरातून इजिप्त, अरेबिया, पर्शिया, आमोन आणि रोमन साम्राज्याशी त्याकाळी मोठा व्यापार चालत असे. सातवाहन कालीन ‘गाथा सप्तशती’ काव्यसंग्रहात (पहिले-दुसरे शतक) शिडांच्या जहाजांचे वर्णन तत्कालीन सागरी व्यापार व नाविक हालचालींचा पुरावा मानला जातो. अरब प्रवासी लेखक अल मसुदी (९१५), अबू झैद (९१६), सुलेमान (८१५) व इबन हौकल (९४३-९६८) यांनी कोकणातील व्यापाराबद्दल खूप लिहिले आहे. विजयनगरच्या राजाकडे हा प्रदेश असताना सुद्धा चौल महत्त्वाचे बंदर होते. पुढे बहमनींची राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्याला स्थलांतरित झाल्यावर चौलचा व्यापार राजापूर, दाभोळ व चिपळूणकडे वळला. तथापि चौलचे महत्त्व मात्र अबाधित राहिले. ठाणे व तत्कालीन कुलाबा जिल्ह्यांचा भाग गुजरातच्या सुलतानाकडे गेल्यावर मात्र चौलचे महत्त्व घटले. १५०९ मध्ये चौल व नागोठणे बंदरे पोर्तुगीजांकडे आल्यावर चौल बंदराचा पुन्हा भाग्योदय झाला. पोर्तुगीजांनी चौल वगळता सर्व बंदरांचा विध्वंस केला. चौलचे मात्र संरक्षण केले. तेथील व्यापार वाढविला. इ.स.१७४० मध्ये एका तहानुसार पोर्तुगीजांनी चौल इंग्रजांच्या तर १७४१ मध्ये इंग्रजांनी ते मराठ्यांच्या स्वाधीन केल्याची नोंद शासकीय दस्तात उपलब्ध आहे.
१३ बंदरे होती व्यापारी बंदरे
इ.स.१८८३ मध्ये जिल्ह्यातील १३ बंदरांच्या सीमाशुल्कासाठी अलिबाग, साक्षी (पेण), राजापुरी-मांदाड आणि बाणकोट अशा चार बंदर समूहात विभाजन होते. अलिबाग समूहात अलिबाग, थळ, रेवदंडा, मांडवा, रेवस आणि धरमतर या सात बंदरांचा समावेश होता. साक्षी (पेण) बंदर समूहात अंतोरा आणि नागोठणे बंदराचा समावेश होता. राजपुरी विभागात मांदाड हे एकमेव बंदर होते. सीमाशुल्कासाठी हे बंदर तळखाडी वा तळ या नावाने ओळखले जात असे. बाणकोट विभागात म्हाप्रळ आणि रत्नागिरीतील इतर बंदरांचा समावेश होता. याशिवाय बाणकोट विभागात महाड(सावित्री), गोरेगाव (तत्कालीन घोडेगाव) आणि दासगाव या तीन बंदरांमध्ये होणाºया व्यापाराचा अंतर्भाव होत असे.
जलमार्ग हेच प्रवासी व मालवाहतुकीचे मुख्य साधन
मुंबई-पुणे लोहमार्ग होईपर्यंत जलमार्ग हेच प्रवासी व मालवाहतुकीचे मुख्य साधन होते. मुंबई-रेवस, धरमतर-रेवस-मुंबई, मांडवा-मुंबई, धरमतर-नागोठणे, पनवेल-उलवा-मुंबई हे जलवाहतुकीचे प्रमुख मार्ग होते.
पोर्तुगीजांच्या आगमनापर्यंत रेवदंडा हे महत्त्वाचे बंदर होते. कालांतराने हे बंदर गाळाने भरल्यामुळे त्याचा उपयोग व्यापारी बंदर म्हणून करणे बंद झाले. धरमतर धक्का १८६८ मध्ये १६ हजार ५३० रुपये खर्चून बांधण्यात आला.
पूर्वी जिल्ह्यातील जलवाहतूक प्रामुख्याने गलबताने होई. अलिबाग बंदरात पडाव आणि लहान बोटी बांधल्या जात असत. अलिबाग बंदरातील बोटी रत्नागिरी व राजापूरचे सुतार बांधत असत. आता धरमतर हे मोठे व्यापारी बंदर झाले आहे.
इ.स.१८८०-८१ मधील कुलाबा सीमाशुल्क विभागातील बोटींची ऐतिहासिक वाहतूक
सीमाशुल्क विभाग भरलेली आलेली गलबते रिकामी आलेली गलबते
संख्या टन संख्या टन
राजपुरी १०९ ७४६ ६११ ६,९४६
अलिबाग १४५३ ९,३५० २,२०६ १७,०८५
साक्षी (पेण) १,७१३ १३,५१६ २,८४८ २५,१२७
एकूण ३,२७५ २३,६१२ ५,६६५ ४९,१५८
सीमाशुल्क विभाग भरलेली गेलेली गलबते रिकामी गेलेली गलबते
संख्या टन संख्या टन
राजपूर ६९७ ७,३९० २० ११४
अलिबाग २,६६९ १९,८०६ ८८३ ५,५५२
साक्षी (पेण) ३.९८७ ३५,६२३ ५२१ २,६२७
एकूण ७,३५३ ६२,८१९ १४२४ ८२९३

Web Title: Historical ports in Konkan are the signs of recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.