महाड: मुसळधार पावसामुळे सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाड शहर आणि परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी शाळेत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आहे. महाडमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सावित्री नदीला पूर आला आहे. समुद्राला ओहोटी लागल्यावर पुराचं पाणी ओसरेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलादेखील बसला आहे. महाड-रायगड मार्गावरील महाडजवळच्या पुलावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला आहे. बिरवाडीतील एका पुलावर पाणी आल्यानं अंतर्गत वाहतूक थांबली असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी दिली आहे.सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. याशिवाय महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दक्षता घेण्यास सूचित केले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 11:46 IST