ज्योती स्टीलबाबत ५ मार्चला सुनावणी
By Admin | Updated: February 24, 2016 03:01 IST2016-02-24T03:01:55+5:302016-02-24T03:01:55+5:30
खालापूर तालुक्यातील होनाड येथील बेकायदेशीर असलेल्या ज्योती स्टील कंपनीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्चला सुनावणी आयोजित केली आहे. त्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन

ज्योती स्टीलबाबत ५ मार्चला सुनावणी
अलिबाग : खालापूर तालुक्यातील होनाड येथील बेकायदेशीर असलेल्या ज्योती स्टील कंपनीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्चला सुनावणी आयोजित केली आहे. त्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोहर कांबळे यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी कांबळे यांना लिंबूसरबत देऊन उपोषण सोडविले.
जिल्हा प्रशासनाने कंपनी हटवून तेथील २८२ विद्यार्थ्यांचे जीवन वाचवावे, कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मनोहर कांबळे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला मानवधिकार संघटना, भारतीय बौद्ध महासभा आणि एमआयएमने पाठिंबा दिला होता.
कांबळे यांच्या प्रश्नाबाबत सुनावणी लावण्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने जारी केले आणि कांबळे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी केली. त्यावेळी आमदार सुरेश लाड कांबळे यांची भेट घेण्यासाठी आले होते.
प्रथम जिल्हा प्रशासनातील क्लार्कने सुनावणीबाबतचे पत्र कांबळे यांना दिल्याने आमदार लाड संतापले. अधिकाऱ्यांना ते पत्र घेऊन पाठवा, असे ठणकावले. त्यानंतर तहसलीदार जयराज देशमुख हे प्रशासनाच्या वतीने पत्र घेऊन आले. त्यानंतर आमदार लाड यांच्याहस्ते लिंबूसरबत घेऊन कांबळे यांनी उपोषण सोडले. कांबळे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता. (प्रतिनिधी)