Hammer on unauthorized construction in Uran | उरणमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा

उरणमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा

उरण : उरण द्रोणागिरी नोड परिसरात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे सिडकोच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली. मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. सिडकोच्या या कारवाईमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबई, पनवेलप्रमाणे उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, धुतूम, पागोटे, नवघर, बोकडविरा, चाणजे, नागाव, म्हातवली, फुंडे आदी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने सिडकोच्या माध्यमातून संपादित केल्या होत्या. त्या वेळी येथील रहिवासी, प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा, वाढीव गावठाण विस्तार, नोकरी, साडेबारा टक्के भूखंडासह इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्या आश्वासनांची पूर्तता न करता उलट संपादित करण्यात आलेल्या भूखंड पडीक ठेवण्याचे काम सुमारे २७ वर्षे केले आहे. त्यामुळे उरण द्रोणागिरी नोड परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि व्यवसायासाठी दुकाने उभारली आहेत. मात्र, सिडकोच्या अतिक्रमण विभागाने ही बांधकामे अनधिकृत ठरवून त्यांना नोटिसा बजावल्या होत्या.

सिडकोच्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी टपरीधारक, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने एकवटले होते. पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना शांत राहण्याचे आवाहन केले. सिडकोने उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्ताच्या शेतजमिनी संपादित केल्या आणि प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबीयांना, त्यांच्या वारसांना वाºयावर सोडल्याचे काम केले आहे. आज त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उभारण्यात आलेल्या बांधकामांवर सिडको कारवाई करण्याचा घाट घालत असेल तर ते योग्य नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र पाटील, एम. जे. पाटील, प्रदीप पाटील या प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Hammer on unauthorized construction in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.