बिल्डर्सवरील तक्रारीत वाढ
By Admin | Updated: September 2, 2015 03:50 IST2015-09-02T03:50:54+5:302015-09-02T03:50:54+5:30
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत असतानाच तेथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून विविध बिल्डर्सनी घरबांधणीचे

बिल्डर्सवरील तक्रारीत वाढ
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत असतानाच तेथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून विविध बिल्डर्सनी घरबांधणीचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहेत. बिल्डर्सकडून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ग्राहकांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या बिल्डर्सविरोधात जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रारींचे प्रमाण सुमारे ६० टक्के असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प प्रस्तावित असून पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग हे तालुके सध्या विकासाच्या वाटेवर आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये नागरीकरण वाढत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध बिल्डर्सनी गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. मोठमोठे होर्डिंग्ज, फसव्या जाहिरातीच्या माध्यमातून हे बिल्डर्स ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांचे बुकिंग घेऊन काही बिल्डर्सनी पळ काढला आहे, तर काहींनी कामेच अर्धवट करुन ग्राहकांना वेठीस धरल्याच्या घटना घडल्या आहेत. स्वप्नांची पूर्तता होताना दिसत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. सातत्याने ते बिल्डर्सच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून बिल्डर्स त्यांना थारा देत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे.