समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध: मंत्री आदिती तटकरे

By निखिल म्हात्रे | Published: January 26, 2024 01:54 PM2024-01-26T13:54:48+5:302024-01-26T13:55:30+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड मैदानात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण 

government committed to development of all sections of society said aditi tatkare | समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध: मंत्री आदिती तटकरे

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध: मंत्री आदिती तटकरे

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क,  अलिबाग - समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे पर्व निरंतर सुरु रहावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी  केले.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानात भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.  याप्रसंगी आयोजित दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड , जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, आदी मान्यवर व इतर अधिकारी,कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 75 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय  सुरू आहे.पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडून येतील, असे लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी या सरकारने सुरू केली आहे.     

महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची, समता-बंधुता एकता या मूल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे.  या आदर्शाना प्रमाण मानूनच राज्यातील गरीब, वंचित, उपेक्षित समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.  या योजना, अभियाने आणि उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यात येत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. 

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी रायगडकरांना मिळाली ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे सांगून शिवाजी महाराजांनी दाखविलेल्य मार्गावर राज्य शासन वाटचाल करीत असून सुशासनासाठी सर्वजण बांधिल असल्याचे सांगितले.

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, शासन आपल्या दारी' या मोहिमेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दिमाखदार झाला. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील चालू आर्थिक वर्षात विविध शासकीय विभागांमार्फत 25 लाख 37 हजार 51 पात्र लाभार्थ्यांना सतराशे चौदा कोटी त्रेसष्ट लाख अठरा हजार इतक्या रक्कमेचे थेट लाभ देण्यात आलेले आहेत. त्या व्यतिरीक्त विविध प्रकारचे दाखले, परवाने, प्रवास सवलती तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्य वितरण या माध्यमातून 2 कोटी 11 लाख 30 हजार 328 लाभार्थ्यांनाही लाभ दिलेले आहेत. विविध विभागांनी समन्वयाने आणि एकजुटीने नागरिकांना हे लाभ दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा नाव लौकीक वाढला आहे असे सांगून त्यांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network System) कार्यप्रणाली मध्ये रायगड पोलिसांनी सन 2022, 2023 मध्ये उत्तम कामगिरी बजावल्या बद्दल तसेच जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अंदाजे 333 कोटी रुपये किंमतीचा अमली पदार्थ साठा जप्ती आणि अवैध शस्त्रसाठा पकडण्याची मोठी कामगिरी केली आहे त्याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन केले.

रायगड आणि मुंबईच पुर्वापार घट्ट नातं आहे. हे नातं आता अटल सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं आणखी दृढ होते आहे. मुंबई आणि रायगड जिल्ह्याला हा जोडणारा सागरी सेतू या जिल्ह्याच्या विकासालाही गती देईल, असा विश्वास असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: government committed to development of all sections of society said aditi tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.