वसतिगृहाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: September 3, 2015 02:56 IST2015-09-03T02:56:19+5:302015-09-03T02:56:19+5:30
पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा मार्ग सिडकोने मंगळवारी मोकळा करून दिला आहे

वसतिगृहाचा मार्ग मोकळा
कळंबोली : पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा मार्ग सिडकोने मंगळवारी मोकळा करून दिला आहे. आदिवासी विभागाला कळंबोली येथे देण्यात आलेल्या भूखंडावरील अतिक्र मणे अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. येत्या दोन दिवसात सोपस्कार करून ही जागा आदिवासी विकास प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक मुलाला कमीत कमी ४० फूट जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पडघे येथील आदिवासी वसतिगृहाकरिता कमीत कमी २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता आहे. इतकी मुबलक जागा पनवेल किंवा आजूबाजूला भाडेतत्त्वावर मिळत नाही. त्याचबरोबर मुबलक शौचालय, चोवीस तास पाणी व इतर सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासारख्या असंख्य अडचणी येतात, यावर पर्याय म्हणून आदिवासी प्रकल्प कार्यालयाने या वसतिगृहाकरिता हक्काची जागा असावी याकरिता सिडकोकडे २०११ साली प्रस्ताव सादर केला होता. त्याकरिता त्या त्या गृहपालांनी सिडकोच्या समाजसेवा, भूमापन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रस्तावित जागा सिडकोने आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरित केली नव्हती.
पनवेल-सायन महामार्गालगत कातकरवाडीच्या बाजूला सेक्टर-१ ई मध्ये भूखंड क्र मांक-१२ हा साडेसतरा गुंठ्याचा भूखंड सिडकोने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरिता मंजूर केला आहे. याकरिता नियमानुसार आदिवासी विकास विभागाकडून रक्कम मार्च २०१४ मध्ये अदा केली होती. त्यानंतर ताबा देण्याची वेळ आली असता त्या ठिकाणी अतिक्र मण असल्याचे उघड झाले. पूर्वी त्यामुळे हा भूखंड ताब्यात घेण्यात आला नाही. या आदिवासी वसतिगृहाला पर्यायी जागा मिळत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून वादंग सुरू आहे. प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याकरिता या जागेवर इमारती बांधणे या विभागाला क्र मप्राप्त झाले आहे. त्यानुसार सिडकोनेही ताबा देवू केला असून लवकरच येथे नवीन इमारतीचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)