गणपती गेले गावाला...
By Admin | Updated: September 22, 2015 03:49 IST2015-09-22T03:49:13+5:302015-09-22T03:49:13+5:30
ढोलताशाच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. ९० सार्वजनिक आणि ५३ हजार ५११ घरगुती गौरी-गणपतींचा त्यामध्ये समावेश होता.

गणपती गेले गावाला...
अलिबाग : ढोलताशाच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. ९० सार्वजनिक आणि ५३ हजार ५११ घरगुती गौरी-गणपतींचा त्यामध्ये समावेश होता.
दुपारनंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची पावले समुद्रकिनारी, नदी, तलाव या दिशेने निघाली. सायंकाळनंतर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने तेथे जत्रेचे स्वरूप आले होते. आबालवृद्धांनी बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये एकच गर्दी केली होती. ढोलताशासह डीजेच्या तालावर तरुणाईची पावले थिरकत होती. काहींनी टाळ मृदुंगाच्या गजरात विविध भजने गात गणरायाची मिरवणूक काढली. गणरायासह गौराईची मिरवणूक पाहण्यासाठी भक्त रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.
रिक्षा, टेम्पो, ट्रक अशा वाहनांमधून गणरायाला निरोप दिला. कोळी आणि आगरी समाजातील महिलांनी एकाच प्रकारच्या साड्या परिधान केल्या होत्या, तर काही तरुण मुलांनी पारंपरिक पोशाख घातला होता. समुद्रकिनारी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल सजले होते. तेथे मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे दिसून आले. विसर्जनाला रात्री उशीर झाल्यास अलिबाग नगरपालिकेने समुद्रामध्ये विजेच्या दिव्यांची सोय केली होती. (प्रतिनिधी)
५,९७१ गणरायांचे व २,५१७ गौरींचे विसर्जन
४कर्जत : तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५,९७७ गणरायांचे व २,६०७ गौरींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवात पावसाने आनंदावर विरजन घातले असले तरी विसर्जनाच्या वेळी उघडीप दिल्याने गणपती व गौरींचे विसर्जन ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता.
पनवेल : पाच दिवसाच्या बाप्पांना सोमवारी भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शनिवारी आगमन झालेल्या गौराईचेही सोमवारी विसर्जन करण्यात आले. तालुक्यात पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली, कामोठे, खारघर तसेच ग्रामीण भागात ठिकठीकाणच्या विसर्जन घाटावर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु होते. यावेळी पनवेल नगरपरिषद, सिडको, पोलिसांच्या वतीने विविध उपायोजन राबविण्यात आल्या होत्या. शहरी भागात १०९९४ घरगुती व सार्वजनिक बाप्पांना यावेळी निरोप देण्यात आला. ग्रामीण भागात देखील ही संख्या दोन हजारापेक्षा जास्त होती. पनवेल शहरात वडाळे तलाव, कृत्रिम तलाव, नवीन पनवेल मधील आदई तलाव, सुकापूर येथील गाढी नदीचे पात्र, खारघरमध्ये कोपरा तलाव, बेलपाडा विसर्जन घाट आदी ठिकाणी गणपती विसर्जित करण्यात आले.