अलिबागेत ‘मार्इंड डायव्हर्टचा गेम’
By Admin | Updated: November 15, 2016 04:52 IST2016-11-15T04:52:04+5:302016-11-15T04:52:04+5:30
सत्ताधारी शेकापला शह देण्यासाठी अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीत विरोधकांकडून मार्इंड डायव्हर्टचा गेम खेळला जात असल्याचे दिसते.

अलिबागेत ‘मार्इंड डायव्हर्टचा गेम’
अलिबाग : सत्ताधारी शेकापला शह देण्यासाठी अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीत विरोधकांकडून मार्इंड डायव्हर्टचा गेम खेळला जात असल्याचे दिसते. शेकापला न्यायालयीन लढाईत गुंतवून ठेवत प्रचारात आघाडी घेऊन नगर पालिकेची सत्ता काबीज करण्याचे मनसुबे विरोधकांनी आखल्याचे पहायला मिळते. परंतु या मार्इंड डायव्हर्टच्या खेळीमुळे दोघांचाही वेळ खर्च होत असल्याने प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीतील शेकापच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराविरोधातील आक्षेपावरील सुनावणी सोमवारी टळली. त्यामुळे शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत नाईक यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल चोपडा यांची धाकधूक वाढली आहे. विरोधकांसाठी या प्रकरणातील निर्णय अतिमहत्वाचा असल्याने त्यांच्याही तोंडचे पाणी पळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेकापला आव्हान देण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा यांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन केली. काँग्रेस, भाजपाला साथ देण्यासाठी आधी शिवसेनाही त्यांच्यात सामील होणार होती, मात्र काही कारणांनी शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामुळे संघर्ष समितीची काही प्रमाणात ताकद कमी झाल्याची धारणा मतदारांमध्ये झाली. शेकापला सहजासहजी विजय मिळवून द्यायचा नाही असा चंगच जणू विरोधकांनी बांधला आहे. यासाठीच त्यांनी सर्वप्रथम नाईक आणि चोपडा यांच्या उमेदवारीवर अर्जाच्या छाननीवेळी आक्षेप घेतला होता. तेथे त्यांच्याविरोधात कौल गेला. त्यामुळे विरोधकांनी थेट जिल्हा न्यायालयात धाव घेत याबाबत दाद मागितली. या सर्व न्यायालयीन लढ्यात विरोधकांनी शेकापला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असले, तरी दुसऱ्या बाजूला विरोधकही गुंतून राहिल्याचे दिसते. मार्इंड डायर्व्हटचा फॉर्म्युला विरोधकांनी खेळला असला, तरी ते सुध्दा त्यात अडकल्याचे चित्र आहे.
निवडणुकीला कमी कालावधी राहिलेला आहे. दोघांनाही प्रचारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आतापर्यंत प्रचाराला मोठ्या प्रमाणात रंगत यायला हवी होती ती अद्यापही आलेली नसल्याचे दिसून येते. विरोधकांनी प्रकरण न्यायालयात नेले असले, तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे शेकापचे प्रदीप नाईक यांनी सांगितले.