प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा
By Admin | Updated: June 3, 2016 02:02 IST2016-06-03T02:02:08+5:302016-06-03T02:02:08+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित महाड, पोलादपूर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून शासनाचा निषेध केला.

प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा
महाड : गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित महाड, पोलादपूर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून शासनाचा निषेध केला.
महाड तालुक्यात ७२ तर पोलादपूर तालुक्यात ३२ आदिवासी वाड्या आहेत. या वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित असून कुठल्याही योजना या आदिवासी बांधवांपर्यंत पोचत नसल्याचा आरोप या मोर्चात करण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व दलितमित्र मधुकर गायकवाड यांनी केले.
चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी चौकातून प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी मधुकर गायकवाड, आदिवासी समाजाचे महाड अध्यक्ष शंकर मुकणे, पोलादपूर तालुकाध्यक्ष काशिराम मुकणे, हरिश्चंद्र जगताप, मोतीराम वाघमारे, अनिल कांबळे, दत्ता पाटकर, लक्ष्मण हिलम यांच्यासह महाड पोलादपूर तालुक्यातील आदिवासी समाज बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)