आविष्कार देसाई
रायगड : तामिळनाडू येथील अंतराळ माेहिमेसाठी तब्बल एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अभिमानाची बाब म्हणजे एक हजार विद्यार्थ्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चारपैकी तीन विद्यार्थी हे अलिबागचे आहेत. या माेहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स असे पाच रेकाॅर्ड नाेंदवले जाणार आहेत.
डॉक्टर पी. जे. अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत एकूण शंभर उपग्रह तयार करण्यात आले आहेत. ७ फेब्रुवारीला जागतिक विक्रम करण्यासाठी तामिळनाडू येथील रामेश्वरममध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमासाठी तीन बाल वैज्ञानिक हे अलिबागमधील आहेत. अवधूत वारगे (९ वी, आरसीएफ सेकंडरी स्कूल कुरूळ-अलिबाग), स्वरा पाटील ७ वी आणि केशवी सावंत इयत्ता ९ वी या दोघी अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या आहेत. विवेक काेळी हा इयत्ता १० वीचा हा विद्यार्थी परळी, पाली-सुधागड शाळेचा विद्यार्थी आहे, अशी माहिती अलिबागमधील समन्वयक संदीप वारगे यांनी दिली.
जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम ) १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००० ते ३८००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले जाणार आहे. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केससोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साइड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि अन्य माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला थेट पाठवतील. या पेलोडसोबत काही झाडांच्या बीजसुद्धा पाठवण्यात येत आहे. त्यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळणार आहे.महाराष्ट्रामध्ये मनीषा चौधरी महाराष्ट्र राज्य समन्वयक आहेत.
देशभरातील हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
या अंतराळ मोहिमेसाठी देशभरातील हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तर, राज्यातील ३७५ विद्यार्थी सहभागी हाेत आहेत. त्यामध्ये पुणे आणि जळगावमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजी जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये याेगदान देता यावे, यासाठी खास महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठीतून प्रशिक्षण दिल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दिली.
Web Title: Four students from Raigad ready for world record; Launch of 100 satellites from Rameshwaram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.