रायगड जिल्ह्यात गोलबोट न लागता आनंदात २०२४ चे स्वागत
By निखिल म्हात्रे | Updated: January 1, 2024 14:22 IST2024-01-01T13:34:28+5:302024-01-01T14:22:37+5:30
अलिबागसह रायगडातील सर्वच किनार्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी करीत नववर्षाचे आनंदमय वातावरणात स्वागत केले.

रायगड जिल्ह्यात गोलबोट न लागता आनंदात २०२४ चे स्वागत
अलिबाग - पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या रायगडच्या समुद्र किनारा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहेत. त्यामुळे नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी किनाऱ्यांना पसंती दिली होती. मागील पाच दिवस मोठ्या संख्येने पर्यटक इथं दाखल झाले आहेत. तर दोन दिवसांत अलिबाग, मुरुड-जंजीरा कर्लई येथील किल्याला सुमारे सव्वा लाख पर्यटकांनी भेट दिली. यामधून पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. तर अष्टविनायक दर्शनापैकी पालीचा बल्लालेश्वर व महडच्या वरद विनायकाचे दर्शन घेऊन भक्तांनी नव वर्षाची सुरुवात केली.
नववर्षाच्या स्वागतावेळी अलिबाग समुद्र किनार्याला गर्दीचे अक्षरशः उधाण आले होते. यावेळी तरुणाईने ठेका धरत बेधूंद नृत्याचा अनुभव लुटला. फटाक्यांच्या आतषबाजीत, जल्लोषात रायगड जिल्ह्यात 2024 सालचे स्वागत करण्यात आले. यंदा लागोपाठ सुट्टीचे दिवस आल्याने किनार्यावरील गावांमध्ये पर्यटक हजारोंच्या संख्येने आले होते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, बोर्ली पंचतन, काशीद, आवास, नागाव, रेवदंडा आदी ठिकाणी हॉटेल आणि वाड्यांमध्येही थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करून 2024 वर्षाचे स्वागत करण्यात आले.
अलिबागसह रायगडातील सर्वच किनार्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी करीत नववर्षाचे आनंदमय वातावरणात स्वागत केले. या काळात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह नगरपालिका यंत्रणाही सतर्क झाली होती. पोलिसांच्यावतीने महामार्गावर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीही परतण्यावेळी उत्साही पर्यटकांच्या बेशिस्तपणाने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे 31 च्या एका दिवशी वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या 581 नागरीकांवर कायदेशीर कारवाई करीत त्यांना 4 लाख 38 हजार 350 रुपयांचा दंड आकारला आहे.