नानवेल दीपगृह बंद असल्याने मच्छीमारांचे हाल; धोका बळावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:17 IST2019-09-10T23:17:03+5:302019-09-10T23:17:13+5:30
वातावरण खराब असताना रात्री दिशा समजत नसल्याने होड्या भरकटल्या

नानवेल दीपगृह बंद असल्याने मच्छीमारांचे हाल; धोका बळावला
संजय करडे
मुरुड : तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. येथे सूर्यदर्शन होत नसल्याने काळ्याकुट्ट ढगाने वातावरणात नेहमीच काळोख असतो. त्यातच खोल समुद्रात सुद्धा ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र काळोख दिसून येतो. अशा या वातावरणात खोल समुद्रात जाणाऱ्या बोटींना मुख्य आसरा हा समुद्रात असणाºया दीपगृहाचा असतो. मुरुड तालुक्यात कोर्लई तर दिघी गावाच्या नजीक मणेरी नानवेल हे दीपगृह आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून मणेरी नानवेल येथील दीपगृह नादुरुस्त असल्याने येथील लाइटचा प्रकाश रात्रीच्या समयी न पडल्याने मच्छीमारांच्या होड्यांचा धोका अधिक बळावला आहे. त्यातच काही बोटींना दिशा न दिसल्याने त्या भलत्याच ठिकाणी जाऊन भरकटल्या गेल्या आहेत.
रात्रीच्या समयी दीपगृहातील लाइट प्रखरतेने प्रज्वलित होऊन समुद्रातील होड्यांना दिशा दाखवण्याचे महत्त्वाचे काम करीत असते. या लाइटच्या प्रकाशावर मच्छीमारांना आपण कोणत्या दिशेला आहोत याचे आकलन होत असते. मात्र दिघी गावाच्या नजीक मणेरी नानवेल हे दीपगृह गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याने येथील लाइटचा प्रकाश रात्री न पडल्याने मच्छीमारांच्या होड्या भरकटल्या आहेत.
संबंधितांनी लक्ष द्यावे-बैले
याबाबत रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले म्हणाले की, नानवेल दीपगृहाची लाइट प्रकाशित न झाल्याने आमच्या कोळी बांधवांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी खडक सुद्धा आहे, जर ही दीपगृहाची लाइट पेटली नाही तर आमच्या होड्या या खडकावर आदळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या समयी काळोख असल्याने मच्छीमारांना दिशा न सापडल्याने होड्या भरकटल्या जात आहेत. जर हा दीपगृह नादुरुस्त असेल तर आजूबाजूच्या सर्व मच्छीमार सोसायट्यांना याची आगाऊ कल्पना देणे आवश्यक आहे. तरी यासंदर्भात संबंधित खात्याने हे लाइट हाऊस तातडीने सुरु करण्याची मागणी बैले यांनी केली आहे.