शेती व्यवसायाला मच्छीपालनाची जोड
By Admin | Updated: June 1, 2016 02:54 IST2016-06-01T02:54:49+5:302016-06-01T02:54:49+5:30
पेण खारेपाटात पारंपरिक शेती व्यवसायाला जोड म्हणून सध्या शेततलाव खोदून त्यामधून मच्छीपालनाद्वारे चांगले आर्थिक उत्पन्न घेण्याकडे पेणच्या शेतकऱ्यांनी मोर्चा वळविला आहे

शेती व्यवसायाला मच्छीपालनाची जोड
पेण : पेण खारेपाटात पारंपरिक शेती व्यवसायाला जोड म्हणून सध्या शेततलाव खोदून त्यामधून मच्छीपालनाद्वारे चांगले आर्थिक उत्पन्न घेण्याकडे पेणच्या शेतकऱ्यांनी मोर्चा वळविला आहे. सध्या स्वत:च्या मालकी हक्काच्या शेततळी उन्हाळ्यात कोरडी पडल्याने या तलावातील मातीचा गाळ उपसून शेततलावांचे चौरस, आयताकृती बांध या गाळाच्या सुक्या ढेपांनी मजबुतीकरण करण्याकडे शेतकऱ्यांचा भर आहे. या गाळउपसा कामासाठी सध्या खारेपाटातील मच्छीसंवर्धन तलावामध्ये जागोजागी या कामाच्या लगबगीचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाची साधने आल्याने फार मोठा बदल घडून आला. सध्या गावोगावच्या सार्वजनिक मालकीचे तसेच ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काचे असणारे शेकडो तलाव गाळात रुतले आहेत. पूर्वी लोकसहभागातून या तलावाचा गाळउपसा होत होता. त्यानंतर रोजगार हमी आली, मात्र रोजगाराची हमी अन् मजुरी मात्र कमी, यामुळे रायगडात रोजगार हमीची कामे फार काळ बाळसं धरू शकली नाहीत.
वर्षाकाठी अधिक आर्थिक उत्पन्न कसे मिळेल यांचा ताळेबंद शेतकरी करतो. पूर्वीची गावागावातली सांधिक, समुदायाने कामे करण्याची पद्धत कालबाह्य झाली, त्यामुळे कृषीक्षेत्रात यांचे बदल घडून आले. सध्या मजूर हा राजा आहे. मान्सूनपूर्व कामांची चहेल पहेल सुरू असताना, शेतीपूरक व्यवसाय म्हणून मच्छीपालनाद्वारे वर्षाकाठी चांगली आर्थिक उत्पन्नाची कमाई होत असल्याने पेणच्या खारेपाटात शेततलावाची भली मोठी संख्या झाल्याचे चित्र आहे. १० गुंठे, २० गुंठे, ४० गुंठे, ८० गुंठे, १०० गुंठे अशा क्षेत्रावरचे हे शेततलावातून मिळणारे उत्पन्न भातशेतीच्या उत्पन्नापेक्षा तिपटीने अधिक मिळत असल्याते पेणच्या खारभूमीक्षेत्रात मच्छीतलावातील गाळउपशाची कामे जोरदार सुरू आहेत. (वार्ताहर)