कर्जत तहसील कार्यालयात आग
By Admin | Updated: July 28, 2015 23:58 IST2015-07-28T23:58:59+5:302015-07-28T23:58:59+5:30
तहसील कार्यालयात सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. मुख्य कार्यालयाला लागून असलेल्या कार्यालयातील जुन्या वायरिंगने पेट

कर्जत तहसील कार्यालयात आग
कर्जत : तहसील कार्यालयात सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. मुख्य कार्यालयाला लागून असलेल्या कार्यालयातील जुन्या वायरिंगने पेट घेतल्याने काही काळ धावपळ उडाली. तहसील कार्यालयाची वीजपुरवठा करणारी जुनी वायरिंग कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग कधी बदलणार? हा प्रश्न अनेक वर्षे अधांतरी आहे.
ब्रिटिश काळातील कर्जत तहसील कार्यालयाची इमारत असून पंधरा वर्षांपूर्वी या कार्यालयातील वीजपुरवठा करणारी अंतर्गत वायरिंग बदली करण्यात आली होती. त्यानंतर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने या कार्यालयातील सर्व यंत्रणा सुस्थितीत असली पाहिजे यासाठी कधीही जबाबदारीने लक्ष घातले नाही. मुख्य कार्यालयात
दुरु स्तीचे काम रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या स्मार्ट कार्यालय योजनेंतर्गत सुरू आहे. त्यात केबल आणि अंतर्गत वायरिंग बदलण्यात येत आहे. हा खर्च जिल्हाधिकारी कार्यालय करीत असताना कार्यालयाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सोयरसुतक नाही. सोमवारी सायंकाळी संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय असलेल्या हॉलमध्ये केबलने पेट घेतला. जुनी पंधरा वर्षांची वायरिंग वेगाने जळू लागल्याने कार्यालयामध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली. (वार्ताहर)
शॉर्टसर्किटने ही आग लागली असली तरी सुदैवाने काहीही नुकसान झालेले नाही. हे कार्यालय टेकडीवर असल्याने तेथे चालत येण्यासाठी पायऱ्या आहेत, त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच अनेक वर्षांपासून बांधलेल्या कारागृहाचीही दुरु स्ती करणे आवश्यक आहे. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याशी संपर्क साधला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झाली नाही. आम्हीच नवीन वायरिंग करून घेणार आहोत.
- रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, कर्जत