स्वच्छतेसाठी काम करणाऱ्यांचा सत्कार
By Admin | Updated: May 14, 2016 00:58 IST2016-05-14T00:58:11+5:302016-05-14T00:58:11+5:30
शौचालय बांधण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवणाऱ्या शबाना शेख, कर्ज काढून शौचालय उभारणाऱ्या शकुंतला साबळे आणि स्वत:चे शौचालय बांधून सबंध आदिवासी वाडी हागणदारीमुक्तीचा नारा देणारे

स्वच्छतेसाठी काम करणाऱ्यांचा सत्कार
अलिबाग : शौचालय बांधण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवणाऱ्या शबाना शेख, कर्ज काढून शौचालय उभारणाऱ्या शकुंतला साबळे आणि स्वत:चे शौचालय बांधून सबंध आदिवासी वाडी हागणदारीमुक्तीचा नारा देणारे लहू वाघमारे यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी आदर्श ठरावे असे कार्य केले आहे. त्यांचा सत्कार खालापूर पंचायत समितीच्या सभापती मालती खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१६-१७ मध्ये हागणदारीमुक्त करावयाच्या २६ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची कार्यशाळा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे संपन्न झाली.
तालुक्यातील स्वच्छतेचे काम अन्य तालुक्यांसाठी प्रेरणादायी आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामात गेल्या वर्षी खालापूर तालुका आघाडीवर राहिला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांना सीएसआर खर्च करण्यास प्रवृत्त केले आहे, असे रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी सांगितले. खालापूर तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी आपल्या प्रस्तावनेत केले.