महामार्गाच्या कामाचा शेतकऱ्याला फटका
By Admin | Updated: May 7, 2017 06:17 IST2017-05-07T06:17:23+5:302017-05-07T06:17:23+5:30
महामार्गाच्या रुंदीकरणात नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीची खालील बाजूची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात

महामार्गाच्या कामाचा शेतकऱ्याला फटका
राजू भिसे/ लोकमत न्यूज नेटवर्क
नागोठणे : महामार्गाच्या रुंदीकरणात नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीची खालील बाजूची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात साचणारे पाणी जायला जागाच राहिलेली नाही. उन्हाळ्यातही शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने भात, तसेच कडधान्याचे पीक घेता न आल्याने एका शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागले आहे.
महामार्गाचे ठेकेदार मोरीची सुधारणा करण्याचे गेली ३ वर्षे फक्त आश्वासनच देत असून, तीन ते चार वर्षे शेती नापीकच राहिल्याची माहिती अयुब मुल्ला यांनी दिली.
अयुब मुल्ला आणि त्यांच्या बंधूंची मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे-पेण फाट्यावर पूर्व बाजूला गट नं. १९३ मध्ये १-६५-३ हे. आर. अशी वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या ठिकाणी १० खंडी भात, तसेच १० पोती वाल आणि पावटा या कडधान्याची पिके दरवर्षी घेतली जायची. महामार्गाच्या रुंदीकरणात जुन्या रस्त्याला जोडून दुसरी मोरी बांधण्यात आलेल्या नवीन मोरीची खालील उंची २ फुटांनी वाढविण्यात आल्याने शेतातच अडून राहते, असे अयुब मुल्ला यांनी सांगितले.
केवळ आश्वासने
महामार्गाचे ठेकेदार असलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत तीन ते चार वेळा ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, आश्वासनांव्यतिरिक्त प्रत्यक्षात काहीही होत नाही. याबाबत दोन वर्षांपूर्वी रोहे तहसीलदारांचेसुद्धा निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.