बनावट मद्याचा साठा जप्त
By Admin | Updated: November 22, 2015 00:31 IST2015-11-22T00:31:42+5:302015-11-22T00:31:42+5:30
जेएनपीटी बंदरातून विदेशी दारूची चोरटी आयात करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लाखो रुपयांची विदेशी दारू आणि

बनावट मद्याचा साठा जप्त
चिरनेर : जेएनपीटी बंदरातून विदेशी दारूची चोरटी आयात करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लाखो रुपयांची विदेशी दारू आणि एक कार जप्त केली आहे. रमेश खिमजी भानुशाली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला २१ नोहेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पनवेल उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना रमेश भानुशाली हा जेएनपीटीतून विदेशी मद्याची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी सापळा रचून त्याला गव्हाणफाटा येथील जावळी गावाजवळील सोनाली वेअर हाऊस येथून स्कोडा गाडीसह अटक केली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्याच्या गाडीच्या डिकीत लपवून ठेवलेल्या बनावट विदेशी दारूच्या (स्क्वॉच) बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या ब्लॅक लेबल-५0 बॉटल्स, जेबी ९ बॉटल्स, टीचर मद्याच्या ४ बॉटल्स; शिवास रिगलच्या ७ , प्लॅटिनम लेबल ३, सेनेरिओ डी लॉस वाइनच्या ९६ आणि ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ७ लाख ४६ हजार ६00 रुपयंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, माणकेश्वर कॉलनी केगाव येथील घराची झडती घेतली असता तिथे विदेशी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य, रिकाम्या बाटल्या आणि बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत १0 लाख ८८ हजार ३६५ एवढी आहे.
उरण परिसरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याचा साठा प्रथमच हस्तगत केला असून, या दारूचा पुरवठा उरण आणि परिसरातल्या वाइन शॉपमध्ये होत असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्त, संचालक आणि उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यांनी बनावट दारू बनवित असलेल्या उरणजवळील ठिकाणाला भेट दिली आणि पुढील तपासाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक कणसे हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)