एक्सेल कंपनीचे गोदाम खाक
By Admin | Updated: October 23, 2016 03:36 IST2016-10-23T03:36:30+5:302016-10-23T03:36:30+5:30
धाटाव औद्योगिक वसाहतीत गुरूवारी रात्री दीपक नाइट्राइट कंपनीत लागलेल्या आगीच्या पाठोपाठ शुक्र वारी रात्री एक्सेल इंडस्ट्रिजमधील फार्मा इंटरमिजिएट प्लान्टच्या

एक्सेल कंपनीचे गोदाम खाक
रोहा/धाटाव : धाटाव औद्योगिक वसाहतीत गुरूवारी रात्री दीपक नाइट्राइट कंपनीत लागलेल्या आगीच्या पाठोपाठ शुक्र वारी रात्री एक्सेल इंडस्ट्रिजमधील फार्मा इंटरमिजिएट प्लान्टच्या गोदामाला आग लागली. आगीत गोदाम भस्मसात झाले. रात्री दुसरी पाळी संपण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. सुदैवाने एकाही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. मात्र आगीमुळे गोदामातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
औद्योगिक वसाहतीत एका मागोमाग एक झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह कामगारांचे कुटुंबिय भयभीत झाले आहेत.
एक्सेल इंडस्ट्रीजच्या फार्मा इंटरमिजिएट प्लान्टच्या गोदामामध्ये ट्रायल घेण्यासाठी इथाईल एसिटेट व एन हेप्टेन अशा दोन्ही सॉल्व्हन्टचे मिळून ६० ड्रम उत्पादनासाठी आणले होते. गोदाम प्लान्टपासून वेगळे आहे. रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी एकादड्रमला आग लागल्याचे सुपरवायझरच्या निदर्शनात आहे. त्यांनी अन्य सहकार्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आणि काखान्यातीलआपत्कालीन संदेश यंत्रणेद्वारे आगीची सूचना दिली. पाणी व फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळत नसल्याचे पाहून रोहा, माणगाव, नागोठणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. सुमारे बारा वाजून पाच मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा व्यवस्थापनाचा प्राथमिक अंदाज आहे.
आग नियंत्रणात आणण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे सुरक्षा अधिकारी व व्यवस्थापन प्रतिनिधी तसेच वसाहतीतील उद्योजकांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांनी तांत्रिक सहकार्य केले.
घटनेची प्रांत रविंद्र बोंबले, तहसीलदार सुरेश काशीद, पोलीस निरिक्षक निशा जाधव, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक तोतेवाड यांनी पहाणी केली आहे. आगीत मालमत्तेचे किती नुकसान झाले, याची तपासणी सुरु असून त्यानंतरच प्रत्यक्ष आकडा कळू शकेल, असे कारखान्याचे व्यवस्थापक हाशीराम मंचेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)