बेचकीच्या दगडाने पक्ष्यांचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:12 IST2019-04-27T01:12:00+5:302019-04-27T01:12:05+5:30
काही लहान मुले खेळ म्हणून या पक्ष्यांना आपल्या बेचाकीच्या दगडांनी भक्ष्य बनवीत आहेत.

बेचकीच्या दगडाने पक्ष्यांचा अंत
मोहोपाडा : चैत्राच्या आगमनाने निसर्गात कमालीचा बदल घडत असल्यामुळे वृक्षाला आलेली नवसंजीवनी त्याचबरोबर आलेली दुर्मीळ आणि रसाळ फळे खाण्यासाठी अनेक पक्षी येत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी हे पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर भ्रमंती करीत निसर्गात तयार झालेला रानमेवा खाण्यासाठी अनेक ठिकाणांचे पक्षी वास्तव्याला येत असतात. शिवाय रसाळ आणि दुर्मीळ फळे मिळत असल्याने या पक्ष्यांची भूक भागली जाते. मात्र हेच त्यांच्या मुळावर उठत आहे. काही लहान मुले खेळ म्हणून या पक्ष्यांना आपल्या बेचाकीच्या दगडांनी भक्ष्य बनवीत आहेत.
सध्या रानात विविध प्रकारची तयार झालेली फळे खाण्यासाठी पक्षी येत आहेत. झाडावरील फळ खाण्यात गुंग असलेल्या या पक्ष्यांवर एखादा दगड त्याच्या जीवाशी खेळत आहे, तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने हे पक्षी गावात येताच त्यांना बंदिस्त केले जाते. तसेच यांचा फायदा ही मुले उचलत आहे. या सर्व कारणावरून पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना पाण्याचे दोन थेंब त्यांची तहान शांत करीत असतात. मात्र, पाणी पिण्यासाठी आलेले पक्षी या बेचकीच्या हातून शिकार होत असतात.