पोलीस मुख्यालयाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप, एसपींनीही धरला ठेका
By राजेश भोस्तेकर | Updated: September 10, 2022 19:49 IST2022-09-10T19:49:05+5:302022-09-10T19:49:41+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक यांनीही धरला ठेका

पोलीस मुख्यालयाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप, एसपींनीही धरला ठेका
अलिबाग : घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन सुरळीत पार पडले. गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन दहा दिवस अहोरात्र सेवा देत असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या गणेशाचे विसर्जन हे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उत्साहात केले जाते. रायगड पोलीस मुख्यालयात आणि अलिबाग पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या गणरायाची मिरवणूक ढोल ताशा, बेंजो, खालु बाजाच्या गजरात नाचत गाजत काढून गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
गणरायाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी घरोघरी झाले. गणेशोत्सव सण हा उत्साहात जिल्ह्यात साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासन हे अहोरात्र काम करीत होते. जिल्हा पोलिस मुख्यालयात ही गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी पोलीस मुख्यालयाचे ५१ वे वर्ष होते. जनतेच्या सेवेत २४ तास सेवा देणाऱ्या पोलिसांना गणरायाची सेवा करता यावी यासाठी पोलीस मुख्यालय अलिबाग येथे गणराय विराजमान केले जातात. अलिबाग पोलीस ठाण्यातही गणराय स्थानापन्न केले जातात.
घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी बसविलेल्या गणरायाचे दीड, गौरी गणपती, अनंत चतुर्थी दिवशी उत्साहात विसर्जन झाले. पोलीस हे गणेशोत्सव काळात बंदोबस्तासाठी असल्याने त्याचे गणरायाचे विसर्जन हे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उत्साहात केले जात. जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी पारंपरिक वाद्यवर ताल धरला होता. त्यामुळे भक्तिमय वातावरणात पोलिसांनी गणरायाला निरोप दिला.
जिल्हा पोलिस तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी धरला ठेका
गणेशोत्सव काळात बंदोबस्तात सेवा दिल्यानंतर पोलिसांच्या गणराय मिरवणुकीत पोलिसांचा उत्साह पाहायला दिसत होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हे सुध्दा गणरायाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलीस प्रमुख असलेल्या दोघांनीही ढोल ताशा वाजवून मिरवणुकीत नचाचा ठेकाही पकडला होता. त्यामुळे इतर अधिकारी, कर्मचारी यांनाही उत्साह आला होता