मुंबई : पालकमंत्री नसल्याने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या रखडलेल्या बैठका मंगळवारी पार पडल्या. मात्र, या बैठकीकडे शिंदेसेनेच्या त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने पालकमंत्रीपदावरून शिंदेसेनेतील नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
पालकमंत्र्यांच्या नियुक्ती जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील नियुक्तीवरून शिंदेसेनेने आपली खदखद जाहीरपणे बोलून दाखविली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना सध्या पालकमंत्रीच नाहीत. रायगडमधील अजित पवार गटाच्या मंत्री महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र, शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनुपस्थित होते.
किल्ले रायगड येथील एका पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण या बैठकीला आलो नाही, असे त्यांनी सांगितले, तर नाशिक जिल्ह्याच्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री दादाजी भुसे अनुपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा त्यांनी केला.