अर्थ फाउंडेशन देणार दरडग्रस्तांना घरे

By Admin | Updated: June 2, 2016 01:34 IST2016-06-02T01:34:44+5:302016-06-02T01:34:44+5:30

हाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या होत्या. मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. जुई, रोहन, कोंडिवते तसेच दासगांव या ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या

Earth Foundation will give houses to the disadvantages | अर्थ फाउंडेशन देणार दरडग्रस्तांना घरे

अर्थ फाउंडेशन देणार दरडग्रस्तांना घरे

दासगांव : महाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या होत्या. मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. जुई, रोहन, कोंडिवते तसेच दासगांव या ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. दासगांवमधील दरडग्रस्तांना गावामध्येच पत्र्याच्या शेड बांधून राहण्याची सोय करण्यात आली होती. गेली १० वर्षे शासनाकडून यांच्या वास्तव्याचा काहीच विचार करण्यात आला नव्हता. मात्र गेल्या एक वर्षापूर्वी यांना शेडच्या राहत्या ठिकाणची जागा देवून शासनाकडून घरासाठी ९५ हजार रु पये मंजूर करण्यात आले व ती रक्कम बांधकामाप्रमाणे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार होती. मात्र अनेक कुटुंबांनी फक्त जोते बांधले व पुढील रक्कम न मिळाल्याने अद्याप घरे बांधू शकलेले नाही. या गरीब कुटुंबांचा विचार करत पनवेल रसायनी येथील अर्थ फाउंडेशन ही संस्था स्वखर्चाने या दरडग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी पुढे आली असून या ठिकाणी दोन घरांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.
२००५ मध्ये महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळल्या. त्याचप्रमाणे दासगांवमध्येही दरड कोसळून ४८ लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र गेली १० वर्षे दरडग्रस्तांना मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे शेड बांधून त्यांचे वास्तव्य करण्यात आले. अनेक संघर्षानंतर शासनाने त्यांना शेडच्या ठिकाणाची जागा घर बांधण्याकरिता आरक्षित करून दिली व घर बांधण्यासाठी शासनाकडून ९५ हजारांची मदत जाहीर केली. मात्र पैसे बांधकामाप्रमाणे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. जवळपास २० लोकांनी पहिल्या टप्प्याचे २० हजार रुपये घेवून कर्ज काढून घरे बांधली मात्र शासनाकडून अद्याप पुढील टप्प्याचे पैसे न मिळाल्याने ही कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. पैशासाठी शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत. तर ज्या लोकांनी पहिल्या टप्प्याचे पैसे घेतले मात्र त्यांची परिस्थिती नाही, अशा जवळपास ५० लोकांनी घराचे जोते बांधून शासनाच्या पैशाची वाट पाहता होते. अशी अवस्था असताना अचानक पनवेल रसायनी येथील अर्थ फाउंडेशनने या ठिकाणी हजेरी लावत आपल्या स्वखर्चाने जेवढे शक्य होईल तेवढ्या प्रमाणात येथील सर्व गरीब कुटुंबांना घरे बांधून देणार असल्याचा विश्वास या ठिकाणच्या दरडग्रस्तांना देत, गेल्या १५ दिवसांपासून दोन घरांच्या कामाला सुरुवात केली आहे.
अर्थ फाउंडेशनचे संस्थापक सिद्धेश सतेरे तसेच मिहिर पाटील हांडे या दोघांनी दरडग्रस्त ठिकाणी येऊन या लोकांची व्यथा जाणून घेतली व या ठिकाणी जेवढे गरीब कुटुंब आहेत त्यांना घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवात म्हणून सुभाष कजीवकर व जयराम निवाते या दोन दरडग्रस्तांच्या घरांच्या बांधकामाला सुरुवात केली. सध्या ही दोन घरे बांधकामासाठी कोणतेच मिस्त्री न वापरता स्वत: सिद्धेश आणि मिहिर हे मिस्त्रीचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे इतर या ठिकाणी लागणाऱ्या कामगारांचे काम एचओसी कॉलेज आॅफ आॅर्कि टेक्चर रसायनी येथील ११ मुलांची टीम काम करत आहे. ९ मे २०१६ पासून दोन घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. एका घरासाठी सरासरी १ लाख २० हजार अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून ४ घरे बांधून पूर्ण करण्यात येणार असून आॅक्टोबर महिन्यापूर्वी इतर १० घरांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. हळूहळू या ठिकाणातील गरीब गरजू लोकांची घरे बांधून देणार असल्याचे खात्रीशीर अर्थ फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Earth Foundation will give houses to the disadvantages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.