खड्ड्यांमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा
By Admin | Updated: April 24, 2017 02:34 IST2017-04-24T02:34:46+5:302017-04-24T02:34:46+5:30
यंदा मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यातच जिल्ह्यातील विविध रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे.

खड्ड्यांमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा
अलिबाग : यंदा मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यातच जिल्ह्यातील विविध रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास नागरिकांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील काही रस्ते हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्यमार्ग यांच्या अखत्यारीत आहेत. जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे आाणि मुंबई-गोवा हे दोन महामार्ग जातात. यातील मुंबई-गोवा महामार्ग वगळता अन्य महामार्गाची अवस्था सध्यातरी चांगली असल्याचे दिसून येते.
मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. पळस्पे-इंदापूर या पहिल्या टप्प्यातील या मार्गावरील पुलांचे काम, कर्नाळा खिंडीचा काही भाग तसेच काही ठिकाणच्या वळणाचे काम अद्याप बाकी आहे. माणगाव, कोलाड आणि पेण येथे तीन पूल नव्याने बांधण्यात येणार आहेत. पहिला टप्पा पळस्पे-इंदापूर आणि इंदापूर- झाराप या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्यामुळे यंद्याच्या पावसातही खड्ड्यातून वाट काढावी लागणार का अशी भीती सतावत आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मार्ग सुस्थितीत करण्यात येईल, असा दावा ठेकेदाराने केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम अद्याप सुरु आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काही रस्त्यांची आताच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भर पावसात या रस्त्यांवरुन प्रवास करणे कठीण होणार आहे. अलिबाग-रोहे, अलिबाग-रेवस, अलिबाग-मुरुड या रस्त्यांवर ठिगळे लावण्यात आली आहेत. ती पहिल्या पावसातच निघण्याची शक्यता असल्याने या रस्त्यांची सुध्दा दैना उडणार असल्याचे चित्र आहे. या मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली होती.
अलिबाग-चौल रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येत आहे. परंतु त्याचे काम कासव गतीने होत असल्याने आताच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ््यामध्ये तर या मार्गावरुन प्रवास करणे केवळ अशक्यच ठरणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. रस्त्यांची कामे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावीत, अशा नियम आहे. परंतु रस्त्यांची कामे ही पावसाच्या आठ दिवस आधी केली जातात. त्यामुळे रस्ते पहिल्याच पावसात उखडतात. रस्त्यांची कामे पावसाळ््यापूर्वी तातडीने करावीत अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
मुरु ड-आंबोली रस्त्याची दुरवस्था
नांदगाव/ मुरुड : आगरदांडा बंदर विकसित होईल व मुरु ड तालुक्यातील सर्व रस्ते चकाचक होतील अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात तसे न घडल्याने मुरु ड तालुक्यातील नागरिक नाराज असून आता सर्व रस्त्यांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना सुद्धा या रस्त्यांच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम खात्याच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लवकरच मुरु ड तालुक्यातील संघर्ष समितीमार्फत तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी या रास्ता रोकोत शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. मुरु ड ते आंबोली रस्ता हा बांधकाम खात्याने मागील तीन ते चार वर्षांपूर्वी बनवला परंतु प्रत्यक्ष काम सुरु असताना अभियंते गैरहजर राहिल्याने संबंधित ठेकेदारांना मोठी सूट मिळत असून रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड येथील जनता करीत आहे. चार वर्षांपूर्वीचा रस्ता खराब झाल्याने आता येथे प्रवास करणे फार जिकिरीचे झाले आहे. अरु ंद रस्ता व प्रत्येक ठिकाणी खड्डे यामुळे या भागातील नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. दुचाकी, तीनचाकी वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता नीलेश खिलारे यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले की, तेलवाडे ते आंबोली या रस्त्याची निविदा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतली असून येत्या आठ ते दहा दिवसात या कामास सुरु वात होईल. तेलवाडे ते आंबोली या रस्त्याची रु ंदी सुद्धा वाढवण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या सार्वजनिक बांधकाम खाते ते डोंगरीपर्यंतचे काम जोरदार सुरु असून येथील काम संपताच या रस्त्याच्या कामास सुरु वात होईल अशी माहिती खिलारे यांनी दिली. हे सर्व रस्ते होत असताना मात्र मुरु ड ते साळावपर्यंतचा रस्ता दुर्लक्षित झाला असून या रस्त्याच्या दुरु स्तीकडे अद्याप लक्ष दिले जात नसल्याची ओरड जनतेकडून करण्यात येत आहे.