आगरदांडा-सावलीया रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली दुरवस्था
By Admin | Updated: May 14, 2017 22:50 IST2017-05-14T22:50:24+5:302017-05-14T22:50:24+5:30
मुरुड तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथील रस्त्यांची समस्या फार बिकट बनली आहे. आगरदांडा ते सावलीया भागातही बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे

आगरदांडा-सावलीया रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : मुरुड तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथील रस्त्यांची समस्या फार बिकट बनली आहे. आगरदांडा ते सावलीया भागातही बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेले अनेक वर्षे हा रस्ता बनण्यासाठी अनेकांनी बांधकाम खात्याकडे निवेदने देण्यात आली होती. परंतु बांधकाम खात्याने रस्ता बनवण्यासाठी सजगता कधी ही दाखवली गेली नाही. त्या भागातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी आगरदांडा ते खोकरी हा दोन किलोमीटरचा रस्ता बनवून जणूकाही जबाबदारी संपली असे वागत आहेत. त्या रस्त्यावर जागोजागी सहा ठिकाणी पॅच मारण्याचे काम ठेवले आहे. त्या पॅचवर असंख्य खड्डे आहेत. यासंदर्भात बांधकाम खात्याचे उपअभियंता नीलेश खिलारे म्हणाले की, ते पॅच इस्टिमेटमध्ये नसून ते सहा नाही तर पाच आहेत. त्या पॅचवर असंख्य खड्डे असले तरी ते पॅच भरण्यात येणार नाही. परंतु साईटपट्ट्या लवकरात लवकर भरण्यात येतील असे यावेळी सांगितले.
पावसाळा सुरु होण्याच्या आत रस्त्यावरचे खड्डे डांबर, खडी मिश्रण करून बुजवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नाहीतर अचानक रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी मिनीडोर रिक्षा संघटनेचे सदस्य पांडुरंग पोटदुखे यांनी दिला आहे.