जिल्ह्यात दरोड्यांचे सत्र सुरूच
By Admin | Updated: September 2, 2015 03:43 IST2015-09-02T03:43:51+5:302015-09-02T03:43:51+5:30
रायगड जिल्ह्यात दरोडे आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून अलिबाग, पालीमध्ये पडलेल्या दरोड्यानंतर हे लोण आता दक्षिण रायगडमध्ये पुढे सरकल्याचे दिसून येत आहे

जिल्ह्यात दरोड्यांचे सत्र सुरूच
महाड/पोलादपूर : रायगड जिल्ह्यात दरोडे आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून अलिबाग, पालीमध्ये पडलेल्या दरोड्यानंतर हे लोण आता दक्षिण रायगडमध्ये पुढे सरकल्याचे दिसून येत आहे. सोमवारी मध्यरात्री माणगाव शहरात भरवस्तीत शुभम ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या सराफ पेढीवर पडलेल्या दरोड्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. तर पोलादपूर शहरात पोस्ट कार्यालयावर दरोडा टाकून पावणेदोन लाख रुपयांची रोकड लुटून दरोडेखोरांनी रात्री पलायन केल्याची घटना घडली. यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.
माणगांव येथील मोर्बा मार्गावर शुभम ज्वेलर्स या पेढीचे लोखंडी शटर्स तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. पेढीचे मालक संदीप बोत्रे यांनी माणगांव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
सोमवारी मध्यरात्री पोलादपूर येथील शिवाजीनगर परिसरात पोस्ट कार्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी लोखंडी कपाटात ठेवलेल्या कापडी पिशव्यामधील १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पलायन केले. प्रभारी पोस्ट मास्तर एम. जी. सलागरे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोस्ट कार्यालयातील कपाटात १६ पिशव्यांमध्ये उपकार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम ३१ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आलेली होती. ही रक्कम त्या त्या ठिकाणी १ तारखेला पगारासाठी पोच केली जात असे. हीच पगाराची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. तालुक्यातील ३० कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम महिन्याच्या शेवटी कपाटात ठेवली जाते. (वार्ताहर)