स्वदेश व नॅबफीसचा करार
By Admin | Updated: May 2, 2017 03:09 IST2017-05-02T03:09:53+5:302017-05-02T03:09:53+5:30
नाबार्ड फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (नॅबफीस) यांच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दक्षिण रायगडमध्ये स्वदेश फाउंडेशनबरोबर

स्वदेश व नॅबफीसचा करार
महाड : नाबार्ड फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (नॅबफीस) यांच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दक्षिण रायगडमध्ये स्वदेश फाउंडेशनबरोबर शनिवारी सामंजस्य करार झाला. शेतकऱ्यांना पशुपालन, अन्नप्रक्रिया व स्वयंसाहाय्यता गटांना छोटे व मध्यम स्वरूपाचे उद्योग सुरू करण्यासाठी स्वदेश फाउंडेशनचे ग्रामीण भागात प्रयत्न केले जात असून, या सामंजस्य करारामुळे या प्रक्रियेला आता अधिक चालना मिळणार आहे. स्वदेश फाउंडेशन व नॅबफीस यांच्या वतीने यावर्षी २५०० ग्रामीण उद्योजकांना दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यल्प दराने कर्जपुरवठा करून या उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
स्वदेश व नॅबफीस यांच्यात शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकात शेतकरी मेळाव्यात या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वेळी नॅबफीसचे चेअरमन जे. के. मोहपात्रा, स्वदेश फाउंडेशनचे विश्वस्त रॉनी स्क्रूवाला, विश्वस्त झरिना स्क्रू वाला, मंगेश वांगे, मुख्य संचलन अधिकारी, गटविकास अधिकारी नितीन मंडलिक, व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पुराण आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ४७ शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी कर्जवाटप करण्यात आले. या वेळी लक्ष्मी टेंबे, विठ्ठल चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले.