Diveaagar shore was blown away by tourists | दिवेआगर किनारा पर्यटकांनी बहरला
दिवेआगर किनारा पर्यटकांनी बहरला

बोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची भुरळ, फेसाळत्या लाटांमध्ये डुंबण्याचा आनंद व माशांवर ताव मारण्यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर तसेच देशभरातून पर्यटक दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर बीचला नेहमीच पसंती देतात. दिवाळीच्या सुट्टीतील शेवटच्या शनिवार-रविवार दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला होता.

पावसाळा संपल्यानंतर दिवाळी हा पर्यटनाच्या दृष्टीने नवीन हंगामाची सुरुवात होत असते. श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाच्या दिवेआगर, श्रीमंत बाळाजी पेशव्यांचे स्मारक व भारतामध्ये दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र आदी पर्यटनस्थळे, तसेच समुद्रकिनारे गेल्या १५ दिवसांपासून ओस पडले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे समुद्रकिनारे फुलून गेले आहेत.
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण कुटुंबसहलीवर आले आहेत तर काही तरुण-तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींसह श्रीवर्धन तालुक्यामध्ये दाखल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दिवेआगर समुद्रकिनारा चांगलाच बहरला आहे. मागील १५ दिवसांमध्ये ग्राहक नसल्याने नाराज झालेले हॉटेल व्यावसायिक घरगुती खानावळ यांना दिलासा मिळाला आहे.
दिवेआगर समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यातील सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या ठिकाणी प्रकट झालेल्या सुवर्ण गणेशामुळे श्रीवर्धनच नव्हे तर रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर चमकू लागला आहे. नव्याने बांधण्यात आलेले दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमंदिर, पुरातन मूर्ती असलेले रूपनारायण, सुंदर नारायण, उत्तरेश्वर मंदिर पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आवर्जून पर्यटक महाराष्ट्रातून येत असतात. सध्या पर्यटनाचा काळ पुन्हा सुरू झाला असून दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरून गेला आहे.
 

Web Title: Diveaagar shore was blown away by tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.