जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच
By Admin | Updated: July 25, 2015 22:43 IST2015-07-25T22:43:51+5:302015-07-25T22:43:51+5:30
रायगड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे जनसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. यामध्ये चोऱ्या, मारामाऱ्या आणि महिलांशी

जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे जनसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. यामध्ये चोऱ्या, मारामाऱ्या आणि महिलांशी निगडित घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक बनत असताना, रायगड पोलिसांच्या माध्यमातून या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता नेमकी काय उपाययोजना करण्यात येत आहे वा किती गुन्ह्यांतील किती गुन्हेगारांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने, पोलीस यंत्रणा नेमके काय करीत आहे याबाबत जनसामान्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.
महाडमध्ये चोरट्याने कुलूप उघडून घरातील १५०० रुपये किमतीचा लावा कंपनीचा मोबाइल, ३ ड्रेस व चार हजार रुपये रोख असा ऐवज, शुक्रवारी सकाळी १०.३० ते २.१५ यावेळी घरफोडी करून चोरून नेला आहे. या घरफोडीप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
मोहोपाडा येथील नाकोडा ज्वेलर्स नावाच्या सोन्या-चांदीच्या दुकानात चोरट्याने शटर लोखंडी पहार व कटावणीसारख्या हत्याराने उचकटून वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे १० ग्रॅम वजनाचे मणी व ४ लाख १० हजार रुपये किमतीची १३ किलो वजनाची चांदीची भांडी असा ऐवज शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरून नेला. रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहा शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील घाग क्लासमधून शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास १२ हजार रुपये किमतीच्या मोबाइलची चोरी झाली. रोहो पोलीस ठाण्यात चोरीची नोंद आहे.
महाड तालुक्यात सापेतर्फेगोवले या गावातील विठ्ठल मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे दोन ते तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. महाड पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरू आहे. (विशेष प्रतिनिधी)
घराच्या बांधकामातून राजपुरी येथे झालेल्या वादातून संगनमताने शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, त्याचा जाब विचारला म्हणून लोखंडी फावड्याने तक्रारदारास मारहाण केल्याप्रकरणी मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अलिबागजवळच्या गरुडपाडा येथे तक्रारदार हे त्यांच्या राहत्या घरी साफसफाई करीत असताना यातील आरोपीने त्यांच्या घरात घुसून तक्रारदारास शिवीगाळी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.