हिरानंदानी प्रकल्पाविरोधात थेट न्यायालयात खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 05:02 IST2019-05-04T05:02:07+5:302019-05-04T05:02:20+5:30
महसूल प्रशासनाचा दणका : कांदळवनांची तोड करणे पडले महागात

हिरानंदानी प्रकल्पाविरोधात थेट न्यायालयात खटला
अलिबाग : तालुक्यातील मौजे पालव (चौल) येथील कांदळवनाची तोड केल्याप्रकरणी मे.डायनामिक्स व्हेकेशन प्रा.लि.चे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक निरंजन एल. हिरानंदानी यांच्या विरुद्ध पर्यावरण अधिनियमानुसार अलिबागच्या न्यायालयात खटला दाखल केला.
मौजे पालव येथे डायनॅमिक्स व्हेकेशन रिसॉर्ट प्रा.लि. या कंपनीने केलेल्या कांदळवन तोडीबाबत नागावच्या ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानंतर महसूल विभागाने वन विभागाचा अहवाल मागविला होता. वन विभागाने जागेची पाहणी करून १० जानेवारी २०१९ रोजी पंचनामा केला. त्यामध्ये कंपनीच्या हक्काच्या क्षेत्रात खाडीलगत एक हजार २०० मीटर क्षेत्रात कांदळवन तोड केल्याचे नमूद केले. मे.डायनामिक्स व्हेकेशन प्रा.लि.कंपनीचे संचालक बांधकाम व्यावसायिक निरंजन एल. हिरानंदानी आणि स्वरूप रेवणकर हे आहेत.
अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात २५ एप्रिल २०१९ रोजी तक्रार दाखल केली. कांदळवन संरक्षण समितीच्या २० नोव्हेंबर २०१८ च्या बैठकीत तक्रार मिळाल्यावर तहसीलदारांनी ४८ तासांच्या आत पाहणी करून अहवाल सादर करावा, प्रांताधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत पर्यावरण अधिनियम १९८६ च्या कलम १९अ नुसार न्यायालयात तक्रार दाखल करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. दरम्यान, मे. डायनामिक्स व्हेकेशन प्रा.लि. या कंपनीचे संचालक स्वरूप रेवणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.