रायगड जिल्ह्यातीतून ‘डायरिया’ होणार हद्दपार, मोहीम राबविण्याचा संकल्प
By निखिल म्हात्रे | Updated: July 3, 2024 11:21 IST2024-07-03T11:20:19+5:302024-07-03T11:21:13+5:30
अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातीतून ‘डायरिया’ होणार हद्दपार, मोहीम राबविण्याचा संकल्प
अलिबाग : स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे.
पोस्टरद्वारे जागृती
‘स्टॉप डायरिया’ या मोहिमेसाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. आठ आठवडे हे अभियान चालणार असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणीबाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावण्यात येणार आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे याबाबत जनजागृती करणे येणार आहे. अंगणवाड्यांमध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद