गुरुपौर्णिमेनिमित्त खोपोलीत भक्तांची मांदियाळी
By Admin | Updated: July 31, 2015 23:11 IST2015-07-31T23:11:49+5:302015-07-31T23:11:49+5:30
खोपोलीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम:’ चा गजर करीत हजारो भक्तांनी गगनगिरी आश्रमात येवून महाराजांच्या

गुरुपौर्णिमेनिमित्त खोपोलीत भक्तांची मांदियाळी
खोपोली: खोपोलीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम:’ चा गजर करीत हजारो भक्तांनी गगनगिरी आश्रमात येवून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
गगनगिरी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या खोपोलीत गुरु पौर्णिमेच्या दिवशी ४० ते ५० हजार भक्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. गुरु वारी सायंकाळी ७ वाजल्यापासूनच ठाणे, मुंबई, कोकण ते थेट कोल्हापूरपर्यंतच्या हजारो भक्तांनी गर्दी करण्यास सुरु वात केली. मुंबईहून येणाऱ्या लोकलमधूनही हजारोंच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या पालख्याही शुक्रवारी खोपोलीत दाखल झाल्या.
महाराजांचे उत्तराधिकारी आशिष महाराज, व्यवस्थापक शिवाजी पाटणकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आश्रमात अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केल्या होत्या. टेंभेस्वामी आश्रम, चिन्मय मिशन या ठिकाणीही गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बोरघाटात दरडी काढण्याचे काम सुरू असल्यामुळे, एक्स्प्रेस - वेची वाहतूक महामार्गावरून वळविल्याने भक्तांची काहीशी गैरसोय झाली. (वार्ताहर)
नामस्मरण कार्यक्रम
रेवदंडा : चौलमधील पर्वतवासी दत्तमंदिर येथे भक्त मंडळींनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परमार्थ निकेतनमध्ये भजन, नामस्मरण असे कार्यक्रम झाले. विविध विद्यालयांमध्ये अनेक शिष्यांनी गुरूंना वंदन केले. फुलांचा भाव गुरुपौर्णिमेमुळे वधारला होता.
दत्तभक्तांनी फुलला मंदिर परिसर
मुरुड : श्रीदत्त गुरूंचा साक्षात्कार झाल्यामुळे सुमारे २५० वर्षांपूर्वी स्वामी ब्रम्हेंद्र महाराज धावडशीकर यांनी मुरुड नगरीच्या उत्तरेस समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंच डोंगरावर श्री दत्त पादुकांची प्रतिष्ठापना केली. अशा हिरवाईने नटलेल्या रम्यस्थळी शुक्रवारी त्याच श्रद्धेने गेली १७-१८ वर्षांपासून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ट्रस्टींसह श्री दत्तभक्त करीत आहेत. दिगंबरा दिगंबरा हे अखंड नामस्मरण आदी धार्मिक कार्यक्र म झाले.
सर.एस.ए हायस्कूल
मुरूड येथे वक्तृत्व स्पर्धा
मुरूड : भारतीय संस्कृतीत व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेची महती कथन करून विद्यार्थ्यांनी ती वक्तृत्वातून साकार केली. वक्तृत्व स्पर्धेत सर. एस. ए हायस्कूल मुरुड येथे इयत्ता ५ वी ते १२ वीच्या ३७ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पर्धेत बाजी मारली ती सावित्रीच्या लेकींनी. श्रुती ठाकूर, सिद्धी विरकूड, स्रेहा गीते, संकेत तांबे, मृण्मयी भगत, प्रत्युष चौलकर, कोमल पाटील आदी विद्यार्थी विजयी झाले.
स्वामी समर्थ मठात महाअभिषेक
नेरळ : कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ मठामध्ये विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.मठामध्ये सकाळी अभिषेक तसेच महाअभिषेक करण्यात आली.त्यानंतर होमहवन होऊन सामुदायिक आरती झाली. सर्व भक्तांसाठी सामुदायिक महाअभिषेक करण्यात आला.