हरिहरेश्वरची विकासकामे अपूर्ण; कोट्यवधींचा पर्यटन निधी वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 02:31 AM2019-11-26T02:31:28+5:302019-11-26T02:31:58+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर हे प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. मात्र प्रेक्षणीय स्थळ असलेल्या या ठिकाणी मूलभूत सुविधांची वानवा आहे.

Development of Harihareshwar incomplete | हरिहरेश्वरची विकासकामे अपूर्ण; कोट्यवधींचा पर्यटन निधी वाया

हरिहरेश्वरची विकासकामे अपूर्ण; कोट्यवधींचा पर्यटन निधी वाया

Next

- गणेश प्रभाळे

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर हे प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. मात्र प्रेक्षणीय स्थळ असलेल्या या ठिकाणी मूलभूत सुविधांची वानवा आहे. तर अनेक विकासकामे अपूर्ण आहेत. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हरिहरेश्वर हे ठिकाण ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे कोकणातील एक सुंदर ठिकाण आहे. येथील सुंदर, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी - पोफळीच्या बागा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. सोळाव्या शतकात बांधलेले हरिहरेश्वरचे प्राचीन मंदिर टेकड्यालगत आहे. मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराबरोबर कालभैरव व योगेश्वरीचे मंदिरसुध्दा पाहावयास सुंदर आहे. असे ऐतिहासिक, पर्यटन आणि धार्मिक महत्व असताना मात्र, हे प्रेक्षणीय स्थळ आजही दुर्लक्षित राहिले आहे.

पर्यटन विकास अंतर्गत हरिहरेश्वर पर्यटन ठिकाणाचा विकास करण्यासाठी सन २००४-०५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या मंजुरीत प्रामुख्याने नवाब लेक व परिसर, हरिहरेश्वर मंदिर व परिसर, धर्मशाळा व परिसर, अस्थिविसर्जन परिसर, स्मशानभूमी व परिसर, भूमिसुधारणा आणि लँडस्केपींग यांचा समावेश होता. प्रमुख कामांतर्गत अनेक कामे केली गेली. अशा पर्यटन वृद्धिंगत करणाºया कामांसाठी अद्याप अनेक कोटी खर्च केले गेलेत. या सर्व कामांची पहाणी केली असता, त्याच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह आहे. कामांवरती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आजतागायत कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र, चौदा वर्षे उलटून गेली तरी हि कामे अद्यापही अपूर्ण राहिली असल्याचे दिसून येते. शासकीय काम अन दहा वर्षे थांब अशी गत झाली. विकासाच्या नावाने गेल्या चौदा वर्षात शासनाने येथे तब्बल कोट्यवधी खर्च केलेत मात्र, अद्यापही अनेक विकासकामे अपूर्ण आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत ही विकास काम होत असतात. हरिहरेश्वरमध्ये पर्यटन विकास अंतर्गत मंजूर कामांपैकी हरिहरेश्वर मंदिर परिसर, धर्मशाळा परिसर, अस्थिविसर्जन परिसर, स्मशानभूमी परिसर, पायाभूत सुविधांचा विकास, भूमिसुधारणा आणि लँण्ड स्केपिंग अंतर्गत बगीच्या कामांचा समावेश होता. या कामाचा निकृष्ट दर्जा पाहता पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुलभ शौचालय ग्रामपंचायतकडे वर्ग केले नाही. निकृष्ट कामांची लवकरच सुधारणा करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत आहे. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.

शौचालयात अस्वच्छता
दरवर्षी हरिहरेश्वरला शेकडो पर्यटक येतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधलेले शौचालय अतिशय निकृष्ट आहे. ग्रामपंचायतकडे ते हस्तांतरित न झाल्याने त्याची देखभाल ही होत नाही. शौचालयात पाणी नसल्याने तेथे दुर्गंधी व अस्वच्छता आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सर्वच कामे अपूर्ण आणि निकृष्ट झाली आहेत. ग्रामस्थांना विचारात घेतले जात नाही. ग्रामपंचायतीला कोणताही पत्रव्यवहार केला जात नाही.
- सचिन गुरव, सदस्य, ग्रामपंचायत
हरिहरेश्वरला भेट दिल्यास येथील अस्वच्छता व असुविधा पाहून नाराजी वाटते. बहुतांशी विकासकामे अपूर्ण दिसतात. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- विवेक नकाते, पर्यटक

Web Title: Development of Harihareshwar incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड